नाशिक जिल्ह्यात माळरानावर फुलविली शेती

By Admin | Published: March 3, 2017 10:25 AM2017-03-03T10:25:01+5:302017-03-03T10:25:33+5:30

ओसाड माळरानावरील जमिनीत वांग्यांची लागवड करत भरघोस उत्पादन घेतले जात आहे.

Floodwood farming in Nashik district | नाशिक जिल्ह्यात माळरानावर फुलविली शेती

नाशिक जिल्ह्यात माळरानावर फुलविली शेती

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत/लक्ष्मण सोनवणे
 
बेलगाव कुऱ्हे (नाशिक), दि. 3 - इगतपुरी तालुक्यातील भावली बुद्रुक या आदिवासी क्षेत्रातील गावात शासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाच्या मदतीने शेतकरी नामदेव तुकाराम शिंदे यांच्या ओसाड माळरानावरील जमिनीत वांग्यांची लागवड करत भरघोस उत्पादन घेतले. प्रारंभी शिंदे यांच्या जमिनीचे सपाटीकरणाचे काम करण्यात आले. त्याच क्षेत्रात ठिबक सिंचनाचा वापर करीत विविध पिके घेतली गेली. शिंदे यांनी शेती उत्पादन पद्धती घटकांतर्गत प्लास्टिक आच्छादनाचा वापर करून वांगी लागवड करून भरघोस उत्पादन घेतले. यासह लक्ष्मीबाई रामचंद्र शिंदे यांनी प्लास्टिक आच्छादन व ठिबक सिंचन योजनेचा वापर करून टमाटे, काकडी, कारले यांची यशस्वी लागवड केली. त्यांनी आपल्या जमिनीत मधमाशी पालन सुद्धा सुरू केले. एवढ्यावर न थांबता या महिला शेतकऱ्याने कोरडवाहू क्षेत्र योजनेअंतर्गत पीव्हीसी पाईपची योजनेचा लाभ घेतला. मनोहर भिकाजी घोडे यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत पेरू फळबाग लागवड योजना अंमलात आणली. प्रभाकर इचम यांनी ठिबक सिंचन प्लास्टिक आच्छादनासह काकडी, टमाटे यांची लागवड केली.
 
इगतपुरीच्या कृषी विभागाच्या प्रयत्नातून राबवलेल्या विविध महत्वपूर्ण योजनांच्या मदतीने सामान्य शेतक-यांचे जीवनमान उंचावले आहे. नाशिकचे कृषी अधीक्षक तुकाराम जगताप, उपविभागीय कृषिअधिकारी गोकुळ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय पथकाने आदिवासी भागातील शेतकर्यांचे कौतुक करण्यासाठी इगतपुरी तालुक्यात विशेष दौरा केला. कृषी विभागाच्या विविध प्रकारच्या योजनांचा फायदा करून भरघोस उत्पन्न घेणार्या शेतक-यांसह मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांचे जिल्हा पथकाने कौतुक केले. इगतपुरी तालुक्यात तालुका कृषी विभाग शासनाच्या अनेक योजना राबवत असते. त्यात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, कोरडवाहू क्षेत्र विकास कायक्रम, पंतप्रधान कृषिसिंचन योजना, रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, जलयुक्त शिवार या योजना प्रामुख्याने राबवण्यात येतात. 
 
जिल्हा पथकाने उपजीविका कृती आराखडा योजनेअंतर्गत शेतक-यांच्या स्वयं सहाय्यता बचत गटांना शेळीपालन व्यवसायासाठी वितरित केलेल्या फिरत्या निधीचा विनियोग व त्याद्वारे बचत गटांना झालेला फायदा याबाबत अधिक माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केले. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्र मासह तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमातून शेतक-यांना शेतीविषयक नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळते. या माहितीचा फायदा प्रत्यक्ष शेती करतांना घेतल्याचे अधिका-यांनी जाणून घेतले. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत वाळविहीर येथील दगडी बांध, सलग समतल चर कामांची पाहणी करून उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.
 
या दौ-याप्रसंगी इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे, कृषी पर्यवेक्षक एस. पी. पाटील, कृषी सहाय्यक प्रदीप नवले, शिवचरण कोकाटे आदी उपस्थित होते. या भागातील उपक्र मशील शेतकरी प्रभाकर इचम, मनोहर पाचरणे, संजय शिंदे, प्रकाश लचके, तुकाराम शिंदे, सुरेश खडके, रामदास सराई आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
आनंदाची बाब 
तालुक्यातील शेतकरी उत्साहाने आधुनिक शेती स्वीकारत आहेत ही नक्कीच आनंदाची बाब आहे. शेतकऱ्यांना स्वयंसिद्ध आणि प्रगतशील करण्याचा आमचा मानस आहे. त्याला शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. -गोकुळ वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक
 
 
जीवनमान उंचावले
यापूर्वी मार्गदर्शन मिळत नसल्याने शेती करतांना खूप अडचणी येत होत्या. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे योजनांचा वापर करून आमचे जीवनमान उंचावले आहे. - सुरेश खडके, आदिवासी शेतकरी
 
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली बुद्रूक येथील शासन योजनेचा लाभ घेत माळरानावर फुलवलेली मिरच्यांची यशस्वी शेती. तर दुसऱ्या छायाचित्रात शेतीची पाहणी करताना इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे, कृषी पर्यवेक्षक एस. पी. पाटील, कृषी सहाय्यक प्रदीप नवले, शिवचरण कोकाटे आदी.
 
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी टी. एन. जगताप, अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक डी. बी. पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ यांच्या जिल्हास्तरीय पथकाने इगतपुरी तालुक्यातील शासकीय योजनांचा परिणामकारक वापर करून यशस्वी झालेल्या शेतक-यांसह त्यांच्या यशाची पाहणी केली. सर्व अधिका-यांनी शेतक-यांचा उत्साह, जीवनमान उंचावण्यासाठी घेत असलेले परिश्रम, स्थानिक अधिका-यांचे मिळत असलेले तांत्रिक मार्गदर्शन, मिळणारे भरघोस उत्पादन यांची माहिती घेतली. यावेळी सर्व यशस्वी शेतक-यांनी मिळवलेले यश पाहून अधिकार्यांनी शेतकर्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

Web Title: Floodwood farming in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.