माळरानावर फुलविली डाळिंबाची बाग !

By Admin | Published: April 17, 2016 02:17 AM2016-04-17T02:17:59+5:302016-04-17T02:17:59+5:30

गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील युवक बशा उर्फ मनसुख विश्रांत चव्हाण व सुरेश या बंधुंनी कर्ज काढून पिकविलेले डाळिंब आखाती देशात पोहोचले आहे़

Flourish pomegranate garden! | माळरानावर फुलविली डाळिंबाची बाग !

माळरानावर फुलविली डाळिंबाची बाग !

googlenewsNext

- बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा(अहमदनगर)

गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील युवक बशा उर्फ मनसुख विश्रांत चव्हाण व सुरेश या बंधुंनी कर्ज काढून पिकविलेले डाळिंब आखाती देशात पोहोचले आहे़ दुबईला डाळिंब एक्स्पोर्ट करणाऱ्या चव्हाण बंधुंना आता बागायतदार अशी नवी ओळख मिळाली आहे़
बशा व सुरेश याची आढळगाव येथे वडिलोपार्जित अडीच एकर माळरानाची शेती आहे़ शेतात सिंचनाची सुविधा नसल्याने ज्वारीचे पीक येणेही दिवास्वप्न होते़ त्यामुळे उदरनिर्वाहासाठी मेंढीपालनाचा फिरस्ता व्यवसाय दोघे भाऊ करायचे़ सुरेशचा विवाह कुसुमशी तर बशाचा विवाह सोनालीशी झाला़ दहावी पास कुसुमने परिस्थितीला आकार देण्यासाठी शेतात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला़ त्यासाठी आढळगाव सोसायटीचे कर्ज काढले़ विहिरीची खोदाई सुरु केली़ त्यांना आईवडिलांच्या श्रमाची जोड मिळाली़ विहिरीला पाणी लागले आणि इतरांकडे पाहतपाहत त्यांनी शेतात ऊस लावला़ त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले़ त्यांना शेतीची गोडी लागली़ मेंढीपालनाची भटकंतीही थांबली़
बशा व सुरेश यांनी रमेश हिरवे, बंटी उबाळे, मनोज ढवाळ, शरद जमदाडे, देवराव वाकडे यांचा सल्ला घेतला आणि दोन एकरावर भगवा डाळिंब लावण्याचे धाडस केले़ ठिबक सिंचनाचा वापर करुन आदिवासी बांधवांनी माळरानावर नंदनवन फुलविले़ रासायनिक खतांपेक्षा शेणखतावरच त्यांनी अधिक विश्वास ठेवला म्हणून निरोगी फळांनी डाळिंब बाग बहरल्याचे चव्हाण सांगतात़
त्यांची बाग रसरशीत डाळिंबांनी
बहरली असून, ४०० ते ७०० ग्रॅमची फळे लगडली आहेत़ चव्हाण यांचे डाळिंब आखाती देशात एक्स्पोर्ट झाली आहेत़ त्यामधून पहिल्याच वर्षी दीड लाखाचा नफा झाला आहे़ पुढील वर्षी नफ्यात दुप्पटीने वाढ होणार आहे़

शेतीने दिला सन्मान
शेळ्या मेंढ्या राखण्याशिवाय काहीच जमत नव्हते़ मात्र, लग्नानंतर आम्हाला शेतीचा मंत्र पत्नींनी दिला़ त्याला गावातील चांगल्या मित्रांचे मार्गदर्शन मिळाले़ म्हणूनच आमच्या शेतात डाळिंब बहरले आहे़ शेतीने आत्मसन्मान तर दिलाच पण समाजात सन्मान मिळवून दिला़ जुनी ओळख पुसून आता प्रगतशील शेतकरी अशी ओळख मिळाली आहे़ आमच्याकडे चोर म्हणून नाही तर बागायतदार म्हणून पाहिले जात आहे़ - बशा चव्हाण, आढळगाव

Web Title: Flourish pomegranate garden!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.