फुले कलामंदिराचे भाडे वाढणार

By admin | Published: June 11, 2016 03:56 AM2016-06-11T03:56:41+5:302016-06-11T03:56:41+5:30

सावित्रीबाई फुले कलामंदिर या नाट्यगृहाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव केडीएमसी प्रशासनाने महासभेला सादर केला आहे.

Flowers Kalamandira rent increases | फुले कलामंदिराचे भाडे वाढणार

फुले कलामंदिराचे भाडे वाढणार

Next


डोंबिवली : सावित्रीबाई फुले कलामंदिर या नाट्यगृहाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव केडीएमसी प्रशासनाने महासभेला सादर केला आहे. व्यावसायिक नाट्यसंस्थांसाठी २५ टक्के भाडेवाढ सुचवताना इतर सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे भाडे कल्याणमधील आचार्य प्र.के. अत्रे रंगमंदिरातील भाड्यानुसार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावित भाडेवाढीमुळे नाट्यरसिकांना भुर्दंड बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे १६ जूनला होणाऱ्या महासभेत लोकप्रतिनिधी, काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
सध्या वीजभारनियमन, देखभाल दुरुस्तीचा वाढता खर्च पाहता ही भाडेवाढ अपरिहार्य आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. २००७ मध्ये नाट्यगृह सुरू झाल्यापासून कोणीतीही भाडेवाढ झाली नाही. तसेच नाट्यसंस्थांच्या भाड्यात २५ टक्के भाडेवाढ आवश्यक आहे. भाडेवाढीकडे लक्ष वेधताना मुंबई व उपनगरांतील नाट्यगृहांमधील भाडेदराचा तुलनात्मक तक्ता प्रस्तावाला जोडण्यात आला आहे.
फुले कलामंदिरात सकाळ, दुपार आणि रात्र अशा तीन सत्रांत कार्यक्रम वा नाट्यप्रयोग होतात. व्यावसायिक नाट्यसंस्थांसाठी प्रस्तावित भाडेवाढ पाहता प्रत्येक सत्राचे दर वेगवेगळे आहेत. १०० रुपये तिकीट असल्यास सकाळच्या सत्रात सध्या ३ हजार २०० रुपये, दुपारी ३ हजार ८०० आणि रात्री ३ हजार ६०० रुपये भाडे आकारले जात आहे. सोमवार ते शुक्रवार दरम्यानच्या कार्यक्रमांसाठी हे भाडे आहे. तर, रविवारी सुटीच्या दिवशी ५ हजार २०० रुपये घेतले जातात. तिकीटदर २०० व त्यापेक्षा अधिक असल्यास त्यासाठीही वेगवेगळे भाडे आकारले जात आहे.
दरम्यान, प्रशासनाचा २५ टक्के वाढीचा प्रस्ताव पाहता १०० रुपयांपर्यंत तिकीटदर असल्यास सकाळच्या सत्रात प्रयोग घ्यायचा असल्यास ४ हजार रुपये संबंधित नाट्यसंस्थेला मोजावे लागणार आहेत. दुपारच्या सत्रात ५ हजार ७५० रुपये, तर रात्री ४ हजार ५०० रुपये भाडे मोजावे लागेल. जर तिकीटदर १०० ते १९९ रुपयांत असेल तर सकाळच्या सत्रासाठी ६ हजार ८७५ रुपये, दुपार व रात्रीच्या सत्रात ८ हजार १२५ रुपये भाडे भरावे लागणार आहे. २०० रुपयांपेक्षा अधिक तिकीटदर असेल तर तिन्ही सत्रांत १२ हजार ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.
बालनाट्यासाठी दिलेली २५ टक्क्यांची सवलत काढून घ्यावी, असेही प्रस्तावात म्हटले आहे. दरम्यान, व्यावसायिक नाट्यसंस्थांच्या व्यतिरिक्त सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक संस्थांसाठी असलेल्या भाडेदरातही अत्रे रंगमंदिराच्या भाडेदराच्या धर्तीवर बदल सुचवले आहेत. यात अनुदानित शाळांच्या कार्यक्रमाला सध्या १० हजार भाडे घेतले जाते. प्रस्ताव मान्य झाल्यास त्यांना १५ हजार भरावे लागेल, तर विनाअनुदानित शाळांना २० हजार रुपये मोजावे लागणार आहे. खाजगी शैक्षणिक संस्था व नृत्य क्लासेस यांच्यासाठी अनुक्रमे २५ आणि २० हजार भाडे ठरवले आहे. शैक्षणिक संस्था पालिका हद्दीबाहेर असल्यास त्यांना २७ हजार रुपये मोजावे लागतील. (प्रतिनिधी)
>...तर प्रयोग करणार नाही- नाट्यनिर्माता संघ
आधीच सुविधांची बोंब, त्यात केडीएमसी २५ टक्के भाडेवाढ करत असल्यास यापुढे डोंबिवलीत नाट्यप्रयोग करणार नाही, असा पवित्रा मुंबई नाट्यनिर्माता संघाचे सचिव दिलीप जाधव यांनी घेतला आहे.
एकही पैसा वाढवून देणार नाही. आधीच १० हजार रुपये भाडे आहे. मुंबईहून डोंबिवलीला येण्यासाठी ७ हजार रुपये खर्च येतो. त्यात २५ टक्के भाडेवाढ करत आहेत, ते आम्हाला परवडणारे नाही.
भाडेवाढीचा निर्णय घेताय, परंतु त्याआधी आपण काय सुविधा देतो, याचाही विचार केडीएमसीने करणे गरजेचे आहे. रेल्वेस्थानकापासून सावित्रीबाई फुले नाट्यगृह लांब आहे. साधी बसची सुविधाही रसिकांना आजपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे प्रस्तावित भाडेवाढ अमान्य आहे. जर वाढीचा निर्णय घेतल्यास डोंबिवलीत प्रयोग करणार नाही, असे जाधव म्हणाले.
ठाणे महापालिकेनेही भाडे वाढवले होते. तेथील भाडे कमी करण्यासाठी प्रशासन अनुकूल आहे. तो निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

Web Title: Flowers Kalamandira rent increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.