कला, क्रीडा विषयांच्या तासिकांवर फुली

By admin | Published: July 14, 2017 03:55 AM2017-07-14T03:55:43+5:302017-07-14T03:55:43+5:30

कला व क्रीडा या विषयांसाठी दरआठवड्याला असलेल्या चार तासिका आता कमी करून दोनवर आणण्यात आल्या आहेत

Flowers on the subjects of Arts, Sports | कला, क्रीडा विषयांच्या तासिकांवर फुली

कला, क्रीडा विषयांच्या तासिकांवर फुली

Next

जान्हवी मोर्ये ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शाळांमध्ये कला व क्रीडा या विषयांसाठी दरआठवड्याला असलेल्या चार तासिका आता कमी करून दोनवर आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांचा कला व क्रीडा विकास खुंटणार आहे, अशी भीती या विषयांच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
क्रीडा शिक्षिका व प्रशिक्षक लीना मॅथ्यू यांनी सांगितले की, सरकार एकीकडे क्रीडा विषयासाठी गुण देते. दुसरीकडे त्यासाठी असलेल्या तासिका कमी करते. त्यातून सरकारने काय साध्य केले आहे. एखादा विद्यार्थी खेळासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर जातो, तेव्हा त्याचा दीड महिना वाया जातो. कला विषयासाठी यंदाच्या वर्षी आठ हजार विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. कलेसाठी ग्रेड असतात. ‘सी’ ग्रेडला पाच, ‘बी’ ग्रेडला १० आणि ‘ए’ ग्रेडला १५ गुण मिळतात. जिल्हा पातळीवर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याला गुण मिळत नाही. त्यात तासिका कमी केल्याने त्याला सरावासाठी वाव व वेळ मिळणार नाही.
सम्राट अशोक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गणेश पाटील यांच्या मते, क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याने विद्यार्थी बैठा होईल. त्याला मैदानात पुरेसा वेळ देता येणार नाही. तासिका कमी झाल्याने निरुत्साहाचे वातावरण विद्यार्थीवर्गात आहे. शारीरिक खेळ नसला, तर विद्यार्थ्याच्या निरोगी व निकोप वाढीवर परिणाम होईल.
सरस्वती विद्यामंदिरातील क्रीडा शिक्षक अंकुर आहेर यांनी सांगितले की, क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याने विद्यार्थी मैदानावर फारसा जाणार नाही. तो पुस्तकी होईल. त्यातील नेतृत्व गुण विकसित होणार नाहीत. त्यामुळे तासिका कमी करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यात बदल होणे अपेक्षित आहेत. डोंबिवलीतील पाटकर शाळेतील क्रीडा शिक्षक गुलाब पाटील सांगितले की, आपण आपला विद्यार्थी आॅलिम्पिक खेळात जाण्याची अपेक्षा ठेवतो. तासिका कमी केल्याने खेळच खेळला जाणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवणार. तासिका कमी करून काय साध्य होणार?
टिळकनगर शाळेतील संगीत विषयाच्या शिक्षिका लीना धाणी यांनी सांगितले की, सरकारने वाढीव गुण दिले. पण, दुसरीकडे तासिका कमी केल्या. ज्या वयात विद्यार्थ्याला कलेची आवड निर्माण होते, त्याच वयात तासिका कमी केल्या आहेत. शिवाय, त्यातही विभागणी केली जाणार आहे. संगीतासाठी एक व चित्रकलेसाठी एक असा तास विभागून त्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरेसा सराव होणार नाही. सरकार दरवेळी वेगवेगळे निर्णय घेते. ते निर्णय शिक्षक, विद्यार्थी व पालकांना विश्वासात घेऊन राबवले जात नाहीत, तर चक्क लादले जातात, असेही त्या पुढे म्हणाल्या.
>कोणत्या समितीने घेतला निर्णय?
कला अध्यापक संघटनेचे अध्यक्ष दिगंबर बेंडाळे यांनी सांगितले की, तासिका कमी करण्याची तरतूद शैक्षणिक नियमावलीत नाही. तासिका कमी करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? कोणत्या समितीचा निर्णय सरकारने ग्राह्य धरला आहे.
एखाद्या आठवड्यात रविवारच्या सुटीला धरून आणखी दोन सुट्या आल्या, तर आठवड्यात दोन तासही कला व क्रीडा विषयांचे शिक्षण अशक्य आहे. कला शिक्षकांना अतिरिक्त होऊ देणार नाही. गुण देणार, असे सांगून दुसरीकडे तासिका कमी केल्या. या सगळ्या गोष्टी परस्परांशी विसंगत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या विकासाला मारक आहे. कमी केलेल्या तासिकांचा निर्णय सरकारने रद्द करावा.

Web Title: Flowers on the subjects of Arts, Sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.