उडाली पक्षिणी, गेली अंतराळी; चित्त बाळाजवळी ठेवूनिया..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 02:26 PM2019-11-20T14:26:05+5:302019-11-20T14:28:36+5:30
सोपान महाराजांचा अपघाती मृत्यू : संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज काळाआड
पंढरपूर : नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे देती पाय! विठ्ठलाच्या प्रवेशद्वाराला नामदेव महाराजांची समाधी आहे. त्यास नामदेव पायरी असे संबोधले जाते. त्या नामदेव पायरीचे सोपान महाराज नामदास हे रोज दर्शन घेत असत. दिंडीत चालत असताना ‘जेसीबी’ने धडक दिल्याने त्यांना अपघातात देवाज्ञा झाली. संतकुळात जन्मलेल्या हा भगवत्भक्त ‘उडाली पक्षिणी, गेली अंतराळी,
चित्त बाळाजवळी ठेवूनिया..’ या नामदेवांच्याच पंक्तीप्रमाणेच आपले चित्त आपणा सर्वांजवळ ठेऊन अंतराळी निघून गेला.
श्रीविठ्ठलाच्या पूर्व द्वाराला महाद्वार असे म्हटले जाते. या ठिकाणी श्री संत नामदेव पायरी आहे. नामदेव पायरीबाबत अशी आख्यायिका आहे की, एकेदिवशी भगवंत नामदेवाला म्हणाले नामदेवा तुला काय हवे असेल ते माग. त्यावर नामदेव म्हणाले, देवा मला वैकुंठ, धन व संपत्ती नको. मला फक्त भक्तांच्या चरणाची रज (पायधूळ) माझ्या मस्तकावर पडेल, अशी जागा दे. आणि नामदेव महाराजांनी देवाकडे हात जोडून महाद्वाराकडे पाहिले. ज्या ठिकाणी जमीन दुभंगली गेली त्या ठिकाणी संत महाराजांच्या घरातील १४ जणांनी समाधी घेतली आहे. तो दिवस १२३८ आषाढ वद्य त्रयोदशीचा होता.
तेव्हापासून पंढरपूरला आलेला प्रत्येक भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाला जाण्यापूर्वी नामदेव पायरीचे दर्शन घेत असतो. यामुळे या पायरीला अनन्य महत्त्व आहे. ह.भ.प. सोपान महाराज नामदास हे श्री संत नामदेव महाराजांच्या घराण्यातील १७ वे वंशज असून, तेही नामदेव पायरीचे रोज दर्शन घेत होते.
आळंदीत होणार समाधी
- ह.भ.प. सोपान महाराज नामदास हे पालखी सोहळ्यासह आळंदीकडे जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. यामुळे आळंदी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच ठिकाणी त्यांची समाधी होणार आहे़
संप्रदायातील शेकडोंची उपस्थिती..
आळंदीतील विष्णू मंदिरापासून नामदास महाराजांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी वारकरी संप्रदायातील शेकडो भाविक उपस्थित होते. इंद्रायणी घाटावर भाविकांच्या उपस्थितीत नामदास महाराज यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.ाहे. त्यांच्या वडिलांवर पूर्वी पंढरपूर येथे चंद्रभागा वाळवंटात अंत्यसंस्कार व समाधी करण्यात आली होती.
मन विषण्ण झाले!
श्री संत नामदेव महाराजांच्या वंशजांचे सतरावे वंशज ह.भ.प. सोपान महाराज नामदास यांचे अपघाती निधन झाल्याची वार्ता समजली. मन विषण्ण झाले. यातून एक गोष्ट लक्षात आली की, अनेक दिंड्या महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येतात. प्रत्येक दिंडीला त्या-त्या विभागातून संरक्षण मिळाले पाहिजे. दिंडी मार्गावर चालणाºया वाहनांना निघतानाच वेगमर्यादा कमी ठेवण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. वाहनधारकांनी तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यामुळे दिंडीमध्ये होणारे अपघात कमी होतील.
- ह. भ. प. गहिनीनाथ
औसेकर महाराज
सहअध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
नामदेवांचे कार्य पुढे नेले !
संत नामदेव महाराज यांचे विचार अन् कार्य पुढे घेवून जाण्याचे काम सोपान महाराज यांनी केले. पालखी सोहळ्याची परंपरा त्यांनी जोमाने पुढे नेली. त्यांच्या अपघात निधनाचे वृत्त समजताच धक्का बसला. वारकरी संप्रदायासाठी ही दुखद घटना आहे.
- ह.भ.प. ज्ञानेश्वर
महाराज जळगावकर,
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती सदस्य.
ंमोठा आघात...
ह.भ.प. सोपान महाराज नामदास यांचे पालखी सोहळ्यात अपघाती निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. हि अत्यंत दु:खत घटना असून महाराजांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायावर मोठा आघात झाला आहे. संतांच्या विचाराचे समाजाला गरज आहे. या स्थितीत महाराजांचे जाणे म्हणजे अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनामुळे न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
- ह.भ.प. सुधाकर
महाराज इंगळे,
वारकरी मंडळ, सोलापूर.