उडते पुणे.....

By Admin | Published: July 16, 2016 01:22 AM2016-07-16T01:22:24+5:302016-07-16T01:22:24+5:30

अंमली पदार्थाच्या वाहतुकीत पुणे हे डेस्टिनेशन ठरू लागल्याचे दिसून येत असून अंमली पदार्थ बाळगणाऱ्या तब्बल २५ जणांना गेल्या सहा महिन्यांत पकडण्यात अंमली पदार्थविरोधी पथकाला यश आले आहे़

Flying pune ..... | उडते पुणे.....

उडते पुणे.....

googlenewsNext

अंमली पदार्थाच्या वाहतुकीत पुणे हे डेस्टिनेशन ठरू लागल्याचे दिसून येत असून अंमली पदार्थ बाळगणाऱ्या तब्बल २५ जणांना गेल्या सहा महिन्यांत पकडण्यात अंमली पदार्थविरोधी पथकाला यश आले आहे़ वाढते शहरीकरण आणि बदलत्या लाईफस्टाईलमुळे व्यसनांचे प्रमाण वाढत आहे़ त्यातूूनच अंमली पदार्थाचा व्यापार वाढत आहे़ राज्यभरात होणाऱ्या अंमली पदार्थाच्या वाहतुकीचे केंद्र पुणे ठरत असल्याचे सांगितले जाते़ ठाणे पोलिसांनी मेफेड्रॉनचा प्रचंड साठा पकडला होता़ त्याचा सोलापूर येथील कारखानाही उद्ध्वस्त केला आहे़ याचे लागेबांधे थेट अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्यापर्यंत पोहोचले आहेत़ ठाण्याला पोहोचलेले हे मेफेड्रॉन पुणेमार्गेच रवाना झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़

कल्याण येथून हेरॉईन घेऊन येणाऱ्या तिघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने नुकतेच पकडले़ त्यांच्याकडून अडीच कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे़ कल्याणहून निघालेले हे हेरॉईन पुण्यात आणून तेथून ते अहमदनगरकडे जाणार होते़ २ किलो ५०० ग्रॅम हेरॉईनची भारतीय बाजारात ८२ लाख रुपये किंमत असून आंतरराष्ट्रीय बाजारात तिची अडीच कोटी रुपये किंमत आहे़ पोलिसांची नजर चुकविण्यासाठी आरोपींनी एका महिलेचा वापर करून तिच्या होंडा सिव्हीक या आलिशान मोटारीतून हेरॉईन आणण्यात येत होते़

पुणे शहर पोलीस दलातील अंमली पदार्थविरोधी पथकाकडून यावर्षी जानेवारीपासून २० गुन्हे दाखल असून त्यात २५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १ कोटी ४१ लाख ८५ हजार ८९० रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे़ त्यात प्रामुख्याने गांजा, ब्राऊनशुगर, हेरॉईन यांची तस्करी होताना दिसत आहे़ गांजा बाळगल्याप्रकरणी १२ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ७३ किलो गांजा जप्त केला आहे़ ब्राऊनशुगर, हेरॉईन विक्री करण्यासाठी आलेल्या ११ जणांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ६ किलो १९४ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले आहेत़

ड्रग्जचे परिणाम
भयंकर
अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या मेंदू तसेच मूत्रपिंडावर परिणाम होतो. आतडी सडतात, नपुंसकत्व येते, भूक मरते, मानसिक संतुलन बिघडते, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते. देशात सुमारे ३० कोटी लोक व्यसनाधीन असून यात तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण अधिक आहे. राज्यात सुमारे २० ते २२ टक्के शाळकरी मुले व्यसनांच्या आहारी गेली आहेत.
गेल्या तीन वर्षांचे रेकॉर्ड पाहता अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळणारी माहिती व त्यावरून केलेल्या कारवाईत वाढ होताना दिसत आहे़ ही केवळ पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून केलेली कारवाई आहे़ याशिवाय शहरात होणाऱ्या अंमली पदार्थाचा व्यापार व सेवन करणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे़
२०१४ मध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ५० गुन्हे दाखल करण्यात आले होते़ त्यामध्ये कोकेन, गांजा, तरंग, ब्राऊनशुगर, एलएसडी, चरस असे एकूण ४२ लाख ७२ हजार ८१० रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते़ त्यात ७३ जणांना अटक करण्यात आली होती़ याच काळात शहरात अंमली पदार्थ सेवन करणाऱ्याविरुद्ध एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले होते़

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाकडून वारंवार कारवाई करण्यात येत असतात. तरुणांमध्ये यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये तसेच विविध आस्थापनांमध्ये जागृती कार्यक्रम आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत असते. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाते. या कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या आरोपींची नियमित चौकशी करण्यात येत असते. अंमली पदार्थांची विक्री अथवा तस्करी चालत असल्यास पोलिसांना माहिती कळवा. पोलीस निश्चितच कारवाई करतील.
- प्रतिभा जोशी, पोलीस निरीक्षक


2015 मध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ४१ गुन्हे दाखल करण्यात आले होते़ त्यात ५४ जणांना पकडून त्यांच्याकडून १ कोटी २० लाख ५४ हजार ९०५ रुपयांचा माल जप्त केला होता़ त्यात कोकेनच्या ३ गुन्ह्यांमध्ये ४ जणांना पकडून त्यांच्याकडून २६ लाख ८३ हजार रुपयांचा माल जप्त केला होता़
मेफेड्रोन, एमडी, चॅवमॅवचे १६ गुन्हे दाखल करून त्यात १८ जणांना अटक करण्यात आली होती़, तसेच एलएसडी, शुगर क्युब्सच्या एका गुन्ह्यात तिघांकडून २९ लाख ९८ हजार ३०० रुपयांचा माल पकडला होता़ २०१५ या वर्षभरात ४० पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये ५५ गुन्हे दाखल असून त्यात १ कोटी ५९ लाख ५४ हजार ९०५ रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते़

Web Title: Flying pune .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.