कर्जमाफीची घोषणा ‘फोकनाड’!
By admin | Published: June 15, 2017 02:08 AM2017-06-15T02:08:43+5:302017-06-15T02:08:43+5:30
अॅड. आंबेडकरांचा आरोप : अटी, शर्तीची अट कशाला? सरसकट द्या!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकरी आंदोलनाच्या नंतर शासनाने घोषित केलेली कर्जमाफी ही ‘फोकनाड’ आहे. भाजपा शासन हे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मानसिकतेतच नाही, त्यांच्या पक्षाचे ते धोरणच नाही त्यामुळेच कर्जमाफी देताना ती प्रत्यक्षात येणार नाही, अशा अटी, शर्ती टाकण्यात आल्याने ही कर्जमाफी फोकनाड असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की कर्जमाफी देण्याची कुवतच या शासनामध्ये नाही. कर्जमाफीसाठी मदत देण्याच्या मुद्यावर केंद्राने हात वर केले आहेत. राज्याच्या तिजोरीचा ३२ टक्के भाग पगार, पेन्शनवर, १२ टक्के आस्थापना, प्रशासनावर, ४२ टक्के खर्च हा भांडवली कर्जाचे व्याज भरण्यात होत आहे. त्यामुळे सरकारकडे कर्जमाफीसाठी कुठलीही तरतूद नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना तत्काळ दहा हजारांची मदत देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. शासनाने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी बँकांना हमी हवी आहे, ती हमी शासनाकडे नाही. त्यामुळे या दोन्ही घोषणांची अंमलबजावणी प्रत्यक्षात येण्याची शक्यता धूसर असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी देताना ज्या अटी, शर्ती टाकण्यात आल्या आहेत, त्या अद्यापही स्पष्ट झालेल्या नाहीत, त्यामुळे या अटी, शर्ती स्पष्ट होईपर्यंत खरिपाच्या हंगामाची पेरणी आटोपली असेल. ही कर्जमाफी प्रत्यक्षात येणार नसल्याची टीकाही त्यांनी केली. कर्जमाफी दिली म्हणून शासनाचा उदो-उदो करणारे तसेच कर्जमाफीचे श्रेय घेणाऱ्या शेतकरी संघटनांनी कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा विचार केला नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना फसविण्याचे काम या शासनाने केले असल्याचे चित्र लवकरच समोर येईल, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. मध्यावधी निवडणूकांच्या शक्यते सदर्भात बोलताना, अॅड. आंबेडकर यांनी मध्यावधी निवडणूकीची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. राज्यात मध्यावधी निवडणूक घेण्याचे संकेत सत्ताधारी पक्षातील दोन्ही पक्ष अप्रत्यक्षपणे देत असतात. प्रत्यक्षात हे संकेत म्हणजे एकमेकांना दिलेली धमकी आहे. भाजपाला शिवसेनेला काबूत ठेवायचे असल्याने मध्यावधीची धमकी दिली जाते, तर सेना आपल्या अस्तित्वासाठी असे संकेत देत असल्याचा आरोप अॅड. आंबेडकरांनी केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीला नव्या नेतृत्वाची गरज!
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे नव्या दमाचा तरुण वळत नाही. या पक्षाची धोरणे काळानुरूप न बदलल्याने पक्षाची वाताहत झाली आहे. पक्षामध्ये नव्या नेतृत्वाला संधी मिळाली तर कदाचित हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा प्रभावी ठरू शकतील, असा आशावाद अॅड. आंबेडकरांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती पदासाठी आदिवासी समाजाचा उमेदवार द्यावा!
राष्ट्रपती पदासाठी जुलैमध्ये निवडणूक होऊ घातली असून, त्यादृष्टीने सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांकडून उमेदवाराच्या नावाचा शोध सुरू झाला आहे. यानुषंगाने राष्ट्रपती पदासाठी आदिवासी समाजाचा उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती भारिप-बमसंचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली. आदिवासी समाज हा अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. इतर समाजानेच त्यांच्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण केले असले, तरी या समाजाला हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवले आहे, त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या समाजाला मानाचे स्थान देण्याची संधी सर्वच राजकीय पक्षांना आहे. भारिप-बमसंकडे ३०२ मतांचे मूल्य असल्याने उमेदवारांबाबत आम्ही सूचना करू शकतो, त्यामुळेच आदिवासी समाजाचा उमेदवार देण्याचा प्रस्ताव दिला आहे, असे अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी पक्षाने गठित केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या सदस्यांनाही याबाबत माहिती दिल्याचे ते म्हणाले.