आपत्ती व्यवस्थापनासाठी ग्रामपातळीवरील कृती आराखड्यांवर भर
By admin | Published: May 15, 2014 01:37 AM2014-05-15T01:37:27+5:302014-05-15T01:37:27+5:30
महाड तालुक्यातील कर्मचार्यांसमवेत ग्रामपातळीवर समित्या स्थापन कराव्यात आणि त्याचा कृती आराखडा २३ मेपूर्वी सादर करावा - तहसीलदार कदम
महाड : महाड तालुक्यातील गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता ग्रामसेवक व तलाठी यांनी पंचायत स्तरावरील विविध खात्यांच्या कर्मचार्यांसमवेत ग्रामपातळीवर समित्या स्थापन कराव्यात आणि त्याचा कृती आराखडा २३ मेपूर्वी सादर करावा, असे आदेश महाडचे तहसीलदार कदम यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत उपस्थित शासकीय अधिकारी व कर्मचार्यांना दिला. आगामी पावसाळा लक्षात घेऊन जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार महाड तालुका आपत्ती व्यवस्थापनाची बैठक मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समवेत नायब तहसिलदार बेलदार, गटविकास अधिकारी म्हात्रे व ग्रामविस्तार अधिकारी एम.डी.सातव आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीमध्ये महाड तालुक्यातील गेल्या काही वर्षात झालेल्या घटनांचा आढावा घेऊन ग्रामसेवक व तलाठ्यांनी आपल्या नेमून दिलेल्या गावाच्या ठिकाणी राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. आरोग्य खात्याचे महत्व लक्षात घेऊन या खात्यांनी आपली यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश तहसिलदार कदम यांनी दिले. १ जून ते आॅक्टोबर अखेरपर्यंत वरिष्ठ अधिकार्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही कर्मचारी अथवा अधिकार्यांनी सुट्टीवर जावू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सुचित केले. सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी डी.के.मोरे यांनी ग्रामसेवक व तलाठी यांची संख्या लक्षात घेता ग्रामपातळीवर विविध खात्यांच्या कर्मचार्यांना एकत्र करून समित्या स्थापन करण्याची सूचना करण्याची सूचना केली.