अकरा पदोन्नतींसह ५० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांकडे लक्ष; प्राथमिक कार्यवाही सुरु झाल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 12:00 PM2021-07-05T12:00:27+5:302021-07-05T12:01:47+5:30
कोरोनामुळे यंदा ३० जूनपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली होती.
जमीर काझी -
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा राज्यातील सत्ताधाऱ्यांशी संबंधित प्रकरणांवर कारवाईचा बडगा व त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचवेळी पोलीस वर्तुळात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नती व बदल्यांबाबत उत्सुकता लागली आहे. ११ बढत्यांसह जवळपास ५० आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुहूर्त कधी मिळतो, याकडे सर्वाचे लक्ष आहे. पोलीस उपायुक्त ते विशेष महानिरीक्षक दर्जापर्यंतचे हे अधिकारी आहेत.
कोरोनामुळे यंदा ३० जूनपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली होती. आता एका पदावर किमान दोन वर्षे पूर्ण झालेल्यांमध्ये राज्य पोलीस दलातील ११ अतिरिक्त महासंचालकांच्या तर ८ विशेष महानिरीक्षक, ७ एडीसीपी-डीआयजी व ३४ उपायुक्त,-अधीक्षकांचा समावेश आहे, त्यापैकी काहींचा अपवाद वगळता सर्वांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. तर पदोन्नतीसाठी पात्र काहीजणांना त्याचठिकाणी बढती दिली जाणार असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
आठवड्याभरात बैठक घेऊन बदल्यांबाबत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्याबाबतची प्राथमिक कार्यवाही सुरु आहे. जुलैच्या मध्यापर्यंत आदेश जारी केले जातील, असे गृह विभागातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
गेल्यावर्षीच्या बदल्यांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या पीएवर आहे. त्याचा दबाव यंदाच्या पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्यांवर आहे. यासाठी शक्यतो सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बढत्या व बदल्यांचे आदेश काढले जावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे सांगण्यात आले.
हे आहेत बढती मिळणारे अधिकारी
आयजी प्रवीण साळुंखे, निकेत कौशिक, निखिल गुप्ता, मधुकर पांडये, ब्रिजेश सिंह, चिरंजीव प्रसाद व रवींद्र सिंगल यांना एडीजी म्हणून पदोन्नती दिली जाईल, तर सोलापूरचे आयुक्त अंकुश शिंदे यांना आयजीची बढती मिळेल. उपायुक्त राजीव जैन, इशू सिंधू व अभिषेक त्रिमुखे यांचे डीआयजी म्हणून प्रमोशन केले जाणार असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.