चारा छावण्या सुरु होणार - खडसे
By admin | Published: August 12, 2015 02:46 AM2015-08-12T02:46:58+5:302015-08-12T02:46:58+5:30
राज्यात चारा छावण्या सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असून जशी मागणी येईल तशी परवानगी देण्यात येईल, अशी माहिती महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
मुंबई : राज्यात चारा छावण्या सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असून जशी मागणी येईल तशी परवानगी देण्यात येईल, अशी माहिती महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
खडसे म्हणाले की, पाण्याचे टँकर सुरु करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले असून टँकर लॉबीचा उपद्रव रोखण्याकरिता त्यावर जीपीएस यंत्रणा बसवणे अनिवार्य केले आहे. लातूर शहर व उस्मानाबाद ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे.
पुढील काही दिवसांत आढावा घेऊन या ठिकाणी रेल्वे मार्गाने पाणीपुरवठा केला जाईल. ज्या भागात पाणी टंचाई आहे तेथील धरणातील पाणी केवळ पिण्याकरिता आरक्षित केले जाणार आहे. वैरण विकास कार्यक्रमात शेती विकास मंडळाकडून चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
कृषी विद्यापीठ, सरकारी जमीनीवर चारा उगवण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. वन विभागांतर्गत कुरणांच्या जमिनी चारा निर्माण करण्याकरिता राखून ठेवल्या जातील. खडसे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई परिस्थितीवरील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. (विशेष प्रतिनिधी)
राज यांनी ‘त्या’ मंत्र्याचे नाव जाहीर करावे
एका मंत्र्याने बदल्यांमध्ये १०० कोटी रुपये खाल्ले या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपाचा समाचार घेताना खडसे म्हणाले की, राज हे विरोधी पक्षात असल्याने त्यांनी असे आरोप करणे स्वाभाविक आहे. मात्र राज यांनी त्या मंत्र्याचे नाव जाहीर करावे. माझ्याकडे ११ ते १२ विभाग आहेत. परंतु मी एकही बदली केली नाही. मंत्री या नात्याने अधिकार असलेल्या तीन-चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच बदल्या केल्या, अशी पुस्तीही खडसे यांनी जोडली.