चारा, पाणी नाही... ऊसतोडच जगण्याचा आधार
By admin | Published: December 11, 2015 11:28 PM2015-12-11T23:28:17+5:302015-12-11T23:48:19+5:30
व्यथा ऊसतोड मजुरांच्या : जन्मत: पडते गाठ कोयत्याशी; मुले शिक्षणापासून वंचित
रवींद्र येसादे-- उत्तूर--दुष्काळानं होरपळून गेलेल्या विदर्भ, मराठवाडा येथील ऊस मजुरांचे तांडे पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आॅक्टोबर महिन्यापासून आले आहेत. आपल्या गावात चारा नाही, पाणी नाही, ऊसतोडच आमच्या जगण्याचा आधार बनल्याची व्यथा ऊसतोड कामगारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.उत्तूर, चिमणे, झुलपेवाडी, धामणे या परिसरात विदर्भ, मराठवाड्यातील ऊस मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. यावर्षी पावसाचे अपुरे प्रमाण यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हिरवाई पाहून आनंद होतो, तो केवळ कारखाने सुरू असेपर्यंतच. गावाकडे जाताना इथल्या मातीला विसरून गावाकडे सुन्न मनाने जावे लागते.केवळ घर उघडे असावे म्हणून वृद्ध तेवढेच गावात आहेत. बाकीचे लहान मुले, महिला तरुण वर्गाच्या हातात ‘कोयताच’ नशिबी आला आहे. ऊस तोडणीवेळी भटकंती असते तशीच ती लहान मुलांची असते. त्यामुळे शाळा शिकणं दुरापास्त होऊन बसलं आहे. नकळत सहा वर्षांचा चिमुरडा हातात कोयता घेतो, हे वास्तव आहे.टोळीवरच्या महिलांची अवस्था तर फार केविलवाणी आहे. गुजेरी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील टोळीतील महिला व्यथा मांडताना म्हणाल्या, स्त्रियांना पहाटे चार वाजता उठावे लागते. सहा वाजेपर्यंत जेवण आटोपून फडात जावे लागते.लेकरांना पहाटेची झोप मिळत नाही. सहा महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन जावे लागते. कधी झाडाच्या फांदीला पाळणा, तर कधी फडात, ट्रकच्या सावलीत निपचित पडावे लागते. रात्रीच्या वेळेस आईला सोडून बोचऱ्या थंडीत विव्हळत पडावे लागते. बिचाऱ्या बाळाला काही कळत नाही. माय मात्र डोकीवर मोळी घेत छकुल्याकडे पहात शेकोटीची बाळाला ऊब देत पावलं टाकीत असते. रात्रीत
ऊस भरण्यासाठी वाहन केव्हा येईल याची खात्री नसते. या साऱ्या त्रासाचा सामना करावा लागतो. पहाट कधी होईल याकडेच लक्ष
द्यावे लागते. ऊन, वारा, पाऊस या साऱ्यांचा सामना करावा लागतो.
शिक्षण अपूर्णच--जून ते आॅक्टोबरपर्यंतच मुलं शाळेत जातात. त्यानंतर मुल आई-वडिलांसमवेत फडामध्ये येतात. वारंवार कारखान्याकडून होणाऱ्या बदल्या, टोळीचे ठिकाण, कामाचे ठिकाण यामुळे मुलांच्या शाळेचा मेळ बसत नाही. त्यामुळे या मुलांचे शिक्षण अपुरेच राहते.
पाच रुपयास एक घागर
लातूर परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे. पिण्यासाठी पाचरुपयास एक घागर पाणी मिळते. तुमच्याकडे पाणी, चारा मुबलक आहे. आमच्याकडे ऊस तोडून जनावरांना घालावा लागतो, अशी केविलवाणी प्रतिक्रिया महिला व्यक्त करतात.