महाराष्ट्रात काही जिल्ह्यात दाट धुके; पावसाळा संपून थंडी सुरु होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 09:45 AM2020-07-26T09:45:43+5:302020-07-26T09:51:41+5:30

धुके पडले म्हणजे पावसाळा संपला असे मानले जाते, शेतकऱ्यांमध्ये धास्ती!

Fogg in many district of maharashstra , As rainy season ended winter start? | महाराष्ट्रात काही जिल्ह्यात दाट धुके; पावसाळा संपून थंडी सुरु होणार का?

महाराष्ट्रात काही जिल्ह्यात दाट धुके; पावसाळा संपून थंडी सुरु होणार का?

Next
ठळक मुद्देयंदा जुलै महिन्यातच प्रथमच राज्यात अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळी धुके

पुणे : पश्चिम व उत्तर महाराष्ट्र, कोकण व विदर्भात काही ठिकाणासह जागोजागी दाट धुके आढळत असल्याने शेतकर्यांमध्ये चिंता आहे. मात्र ही ही एक नैसर्गिक घटना आहे. पावसामुळे वातावरणातील मोठ्या प्रमाणात साठलेले बाष्प पहाटे कमी होणार्या तापमानामुळे दवबिंदु-धुक्याच्या रुपाने आढळत आहे, त्यामुळे शेतकर्यांनी घाबरु नये, असे तज्ञांचे मत आहे.

यंदा जुलै महिन्यातच प्रथमच राज्यात अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळी धुके दिसत आहे. धुके असलेल्या ठिकाणी जागोजागी दवबिंदू देखील पहायला मिळत आहे.

हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी 'लोकमत'ला सांगितले, " जळगाव, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळून आलेल्या धुक्या संदर्भात प्रा. जोहरे म्हणाले, "धुके पडले म्हणजे पावसाळा संपला असे मानले जाते, मात्र मान्सून पॅटर्न बदललेला आहे त्यामुळे असे घडते आहे आणि पावसाळा संपलेला नाही व यावर्षी दुष्काळ देखील पडणार नाही."

धुके का पडते याबद्दल प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले -

धुके म्हणजे काय ?

धुके म्हणजे पाणी आणि बर्फाचे अत्यंत सुक्ष्म कणांचे तरंगते थर होय. धुके म्हणजे जमिनी लगत तरंगते ढगच होय. धुके म्हणजे मूलतः हवेत तरंगणाऱ्या अतिसूक्ष्म जलकणांचा किंवा हिमकणांचा जमिनीलगत तयार झालेला समुच्चय. यामुळे एक किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरापर्यंतची दृश्‍यता कमी होते. मंद गतीने वारे वाहत असलेल्या पाणथळ प्रदेशांत किंवा जिथे पावसाळ्यात खूप पाऊस पडून जमिनी ओल्या झाल्या तिथे धुके हमखास तयार होते. ते काही मीटर जाड असून, सूर्योदयानंतर काही तासच टिकते. या धुक्‍याचा अस्तित्व काळ आणि त्याची जाडी प्रदेशाची रचना व दिवसभरात तिथे वाढलेले तापमान यावर ठरते. शिशिर ऋतूतील सूर्याची कमी दाहकता आणि नदी-खोऱ्यासारखा सखल प्रदेश यामुळे धुके खूप दाट होऊन जास्त काळ टिकते. 

*धुक्याचे प्रकार*

स्थानपरत्वे या धुक्‍याचे किनारी धुके (Coastal fog ), हिमधुके (Ice fog ) आणि उर्ध्वगामी प्रारण धुके (Advection Radiation fog ) असे प्रकार पडतात. या सर्व प्रकारच्या धुक्‍यातील जलकणांचा व्यास दहा मायक्रोमीटर एवढा असतो.

अजब गजब धुके!*

धुके हे नेहमीच एकजिनसी, एकसंध आणि विस्तृत क्षेत्रव्यापी असतेच असे नाही. काही भागावर दाट धुके तर नजीकच्या प्रदेशात त्याचा लवलेशही नाही असा आविष्कारही दिसतो. सामान्यपणे नदीपात्रे, खोरी, खाड्या आणि बंदरे या भागात धुके लगेचच तयार होते. रात्रीच्या वेळी आणि सकाळी धुक्‍याचा प्रभाव अधिक असतो. 

महाराष्ट्रात जुलै मध्ये धुके का?

थंडीत हवेतील आर्द्रता शंभर टक्के झाली तरी धुके निर्माण होते. मात्र 95 टक्क्यापेक्षा कमी आर्द्रता असतांना देखील धुके पडू शकते. बाष्पाचा मुबलक पुरवठा असतांना पाण्याचा गोठण बिंदू आणि वातावरणाचे तापमान यात ढोबळमानाने अडीच डिग्री सेल्सिअस इतका तापमानातील फरक आढळल्यास धुके निर्मितीस अनुकूल स्थिती तयार होते.

मुबलक पाणी आणि त्याचे बाष्पीभवन होण्यासाठी लागणारे तापमान, वार्याची स्थिती अशा अनेक गोष्टींवर धुके अवलंबून असते. धुक्यासाठी बाष्पाचा पुरवठा हा जवळचा समुद्र, नदी, तलाव, ओढा किंवा तळ्यातील पाण्यापासून होतो. अनेकदा सुर्याची उष्णता देखील जमिनी पर्यंत पोहचण्यास दाट धुके हे अडथळा ठरते. ढगाळ वातावरणात दिवसा धुक्याची चादर अनेकदा पसरते. दहा-पंधरा डिग्री सेल्सिअस तापमानात देखील धुके पसरते दिसून येते. सध्या जुलै अखेरीस धुके तयार होण्यास पावसामुळे अशी नैसर्गिक अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने उत्तर महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी धुके पडण्या मागचे हेच कारण होय.

जगात सर्वाधिक धुके कोठे ?

आइसलॅंड (Island) येथील ‘ग्रँड बँकस्’ (Grand Banks) हे जगातील सर्वात जास्त धुके असणारा प्रदेश होय. जमिनीवर सर्वाधिक धुके असलेल्या प्रदेशात अर्जेंटिना, न्यूफाउंडलँड, लॅब्राडोर व पाँइंट रेयज, कॅलीफोर्निया या ठिकानांचा समावेश होतो. या ठिकाणी वर्षातील 200 दिवस धुके आढळते. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद सारख्या ठिकाणी पंधरा मिनिट ते अर्धा तास इतक्या कमी वेळात अचानक धुके पसरते असा अनुभव आहे. भारतात तुलनेने कमी दिवस धुके दाटते, मात्र धुके दूर करण्यासाठी कुठलीही यंत्रणा अद्याप भारतात विकसित झालेली नाही.

Web Title: Fogg in many district of maharashstra , As rainy season ended winter start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.