लोककलावंतांना मिळणार हक्काचे घरकुल?
By admin | Published: April 21, 2016 01:05 AM2016-04-21T01:05:05+5:302016-04-21T01:05:05+5:30
लावणी कलावंत, वाघ्या-मुरळी, वासुदेव, नंदीबैल, शाहीर, दशावतार, डोंबारी अशा लोककलावंतांचे हातावरचे पोट आणि उपेक्षित जीवन. तमाशा कलावंतांचीही हीच तऱ्हा.
प्रज्ञा केळकर-सिंग, पुणे
लावणी कलावंत, वाघ्या-मुरळी, वासुदेव, नंदीबैल, शाहीर, दशावतार, डोंबारी अशा लोककलावंतांचे हातावरचे पोट आणि उपेक्षित जीवन. तमाशा कलावंतांचीही हीच तऱ्हा. वर्षानुवर्षे चालत आलेला लोककलेचा वारसा जपत असताना डोक्यावर छत आणि दररोज पोटभर जेवण मिळण्याचीही भ्रांत. दुष्काळी परिस्थितीचा बसणारा फटका.
अशा वेळी स्वत:चे हक्काचे घर मिळवणे हे त्यांच्या दृष्टीने स्वप्नच. पण, राज्य शासनाच्या इंदिरा आवास योजनेमध्ये ५ टक्के आरक्षणाचे आश्वासन मिळाल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार या नियमाचा अध्यादेश येत्या १५-२० दिवसांमध्ये निघण्याची शक्यता आहे. लोककलावंत वर्षानुवर्षे उपेक्षितच राहिले आहेत. दुष्काळाची परिस्थिती, घरातील दारिद्य्र यामुळे त्यांना बरेचदा आयुष्यातील मुलभूत गरजांनाही मुकावे लागते. बिऱ्हाड पाठीवर घेऊन जिथे कार्यक्रम मिळतील तेथे जायचे, लोककला सादर करायची, पुन्हा पुढचा दौरा हाच त्यांचा दिनक्रम. अशा वेळी आयुष्यात स्थैर्य मिळवता यावे, यासाठी स्वत:च्या घरकुलाचे लोककलावंतांचे स्वप्न आता सत्यात उतरू पाहत आहे. अखिल भारतीय लोकनाट्य मराठी तमाशा परिषदेची पंकजा मुंडे यांच्यासमवेत नुकतीच बैठक झाली. त्यावेळी इंदिरा आवास घरकूल योजनेमध्ये लोककलावंतांना ५ टक्के जागा देण्याचा निर्र्णय घेण्यात आला, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी दिली.
> काय आहे योजना ?
इंदिरा आवास घरकूल ही योजना १९९५-९६ पासून स्वतंत्रपणे राबविली जाते. ग्रामीण भागातील दारिद्य्र रेषेखालील बेघर/कच्चे घर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतीक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाते.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्य्र रेषेखालील असावा, कायम प्रतीक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत. लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाते.
या योजनेंतर्गत लोककलावंतांना स्वत:चे घरकूल उभारण्यासाठी शासनातर्फे १ लाख रुपयांचा निधी तर तमाशा फड मालकाकडून ५० हजार रुपयांची उचल दिली जाऊ शकते. कलावंताच्या मानधनातून दर महिन्याला ही रक्कम फेडून घेता येऊ शकते. प्रत्येक जिल्ह्यातील लोककलावंतांच्या यादीतून इंदिरा आवास घरकूल योजनेसाठी नावे सुचवली जातील. या योजनेमुळे त्यांना हक्काचे घर मिळू शकेल, असे जाधव यांनी सांगितले.
> सुपाऱ्यांमध्येही यंदा ४० टक्के घट
सध्या राज्यभरात भीषण दुष्काळाचे सावट पसरले आहे. या दुष्काळी परिस्थितीचा सामना सर्वच क्षेत्रांना करावा लागत आहे.
हातावर पोट असणाऱ्या लोककलावंतांना दुष्काळी परिस्थितीचा फटका बसला आहे. नावलौैकिक असणाऱ्या मोठे फड वगळता इतर लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दर वर्षीच्या तुलनेत यंदा मिळणाऱ्या सुपाऱ्यांमध्ये ३०-४० टक्के घट झाली आहे. सुपाऱ्यांच्या किमतीतही घसरण झाली आहे. एक लाख रुपयांची सुपारी ६०-६५ हजार रुपयांवर आली आहे.
दुष्काळाच्या परिस्थितीत कलावंतांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन
शासनाच्या वतीने त्यांच्यासाठी टोलमाफी, कमी दराने डिझेल अशा सवलती
द्याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय लोकनाट्य तमाशा परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.