देशभरातील लोकगीतांचे होणार संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:17 PM2018-09-13T12:17:57+5:302018-09-13T12:19:40+5:30
केंद्र सरकारच्या माहिती, सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने देशभरातील निरनिराळ्या प्रांतांमध्ये वास्तव्यास असलेल्या जाती-जमातींच्या लोकगीतांचे दृक्श्राव्य स्वरूपात संकलन केले जात आहे.
गणेश वासनिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र सरकारच्या माहिती, सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने देशभरातील निरनिराळ्या प्रांतांमध्ये वास्तव्यास असलेल्या जाती-जमातींच्या लोकगीतांचे दृक्श्राव्य स्वरूपात संकलन केले जात आहे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे संस्कार, सण, उत्सव आणि त्यावर आधारित लोकगीतांच्या संवर्धनास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात लोकगीतांच्या संवर्धनाची जबाबदारी आकाशवाणी केंद्रांकडे सोपविण्यात आली आहे.
प्रसार भारतीच्या विविध आकाशवाणी परिक्षेत्रात येणाऱ्या जाती-जमातींचे लोकगीत ध्वनिमुद्रित करणे, या गीतांची मूळ संहिता त्याच भाषेत लिहिणे, मूळ गीतांचे इंग्रजीत व हिंदीत भाषांतर करणे, त्या गीतांचे नोटेशन तयार करणे तसेच आॅडिओ तथा व्हिडिओ ध्वनिमुद्रण केले जात आहे. केंद्रीय माहिती सूचना व प्रसारणमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पूर्णत्वास आणला जात आहे. दुर्मिळ लोकगीतांच्या संवर्धनाचे काम २०१६ पासून सुरू आहे. आदिवासी भाषांना लिपी नसल्याने संशोधनासाठी आकाशवाणी केंद्रांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. देशात विविध प्रांतांमध्ये प्रत्येक २०० ते ३०० किमी अंतरावर भाषा, संस्कृतीत बदल होतो. हीच बाब लोकगीतांच्या माध्यमातून संवर्धन केली जात आहे.
मेळघाटच्या कोरकू, गवळींच्या २०० लोकगीतांचे संकलन
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या कोरकू, गवळी जमातीची संपूर्ण जीवन व्यवस्था लोकगीतांनी व्यापली आहे. त्यांच्या लौकीक आणि पारलौकीक जीवनाची अभिव्यक्ती लोकगीतातूनच झाली आहे. या दोन्ही समाजांची गीते एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत आलेली आहेत.अमरावती आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम प्रमुख तथा प्रकल्पप्रमुख सुनालिनी शर्मा, प्रकल्प निर्मिती सहायक संजय ठाकरे, मार्गदर्शक काशीनाथ बºहाटे, सुनील मावस्कर, रामगोपाल भिलावेकर आदींच्या परिश्रमातून २०० लोकगीतांचे संकलन करण्यात आले आहे. ही लोकगीते आॅडिओ, व्हिडिओ, मूळ संहिता, हिंदी भाषांतर, संगीतबद्ध करून केंद्र सरकारकडे पाठविली आहेत.
दिल्ली वगळता अन्य राज्यांतील १५० जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प पोहोचला आहे. आतापर्यंत २० हजार लोकगीतांची मूळ संहिता प्राप्त झाली आहे. प्रकल्पांचे हिंदी व इंग्रजी भाषांतर, छायाचित्र उपलब्ध झालेत. गुजरातपासून तर मणीपूर आणि काश्मीरपासून ते पोर्ट ब्लेअरपर्यंत १५० भाषांतील लोकगीते संकलित झाली आहेत.
- सोमदत्त शर्मा, लोकगीत प्रकल्प प्रमुख, दिल्ली.