शिस्त पाळा, नाहीतर पुन्हा निर्बंध; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:40 AM2022-04-28T11:40:55+5:302022-04-28T11:41:52+5:30
आधीच्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली, अनेकांचे रोजगार गेले. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोरोनाचा सामना करण्याच्या दृष्टीने वर्तणूक अंगीकारणे आवश्यक आहे.
मुंबई : राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत:हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी संवाद साधला. रुग्णांमध्ये फ्लू सदृश्य लक्षणे आढळल्यास तत्काळ आरटीपीसीआर करा, टेस्टिंगची संख्या, लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
आधीच्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली, अनेकांचे रोजगार गेले. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोरोनाचा सामना करण्याच्या दृष्टीने वर्तणूक अंगीकारणे आवश्यक आहे. राज्यात आपण या तीन लाटांच्या काळात सुरू केलेल्या आरोग्य सुविधा बंद केल्या नसल्या तरी त्या वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
प्रश्नांची दखल घ्या : विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सामान्यांचे प्रश्न तातडीने तिथेच सोडवावेत. धोरणात्मक बाबीशी संबंधित तेवढेच विषय मंत्रालयात यावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मास्क सक्तीची शिफारस नाही; मुख्यमंत्री घेणार निर्णय
गर्दीच्या वा बंदिस्त ठिकाणी मास्कसक्तीची शिफारस टास्क फोर्सने केलेली नाही. मास्क वापराची सवय लावावी, गर्दी असलेल्या तसेच बंदिस्त ठिकाणी, रुग्णालयांमध्ये मास्क वापरावर भर द्यायला हवा, असे टास्क फोर्सने म्हटले आहे. पंतप्रधानांसोबतच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केंद्राने केलेल्या सादरीकरणात मास्क वापराचा आग्रह धरला गेला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे लवकरच पुन्हा टास्क फोर्सशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते.
लसीकरण सक्तीचे करा
लसीकरण सक्तीचे करा तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस देताना नऊ महिन्यांचा कालावधी कमी करा, या मागण्यांचे पत्र केंद्र सरकारला पाठविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना बूस्टर डोस खासगी रुग्णालयांमध्ये पैसे देऊन घ्यावा लागत आहे. त्यांनाही सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत बूस्टर डोस देण्याचा विचार सरकार करणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.