महायुतीचा धर्म पाळा, अन्यथा स्वबळावर
By Admin | Published: January 19, 2017 12:22 AM2017-01-19T00:22:54+5:302017-01-19T00:22:54+5:30
विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम संघटना यांनी भाजपाशी युती केली
नाशिक : विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम संघटना यांनी भाजपाशी युती केली होती. निवडणुकीनंतर शिवसेनाही महायुतीत सामील झाली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र दोन्ही पक्ष युतीवरून अडले आहेत. आमच्यासारख्या छोट्या घटकपक्षांना सोबत न घेतल्यास आम्ही तीनही घटक पक्ष एकत्र येऊन महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका लढण्यास तयार आहोत, असा इशारा खासदार राजू शेट्टी व आमदार विनायक मेटे यांनी शिवसेना-भाजपाला दिला.
नाशिक येथे स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या मेळाव्यासाठी खासदार शेट्टी आले होते. तर शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी आमदार मेटे आले होते. दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. त्या वेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्ष, शिवसंग्राम संघटन तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत माहिती दिली. मेटे यांनी सांगितले की, महायुती समन्वय समितीची तातडीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेण्याची मागणी आम्ही तीनही पक्षांनी केली आहे. सद्यस्थितीत शिवसेना व भाजपात युती होईल, असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही तीनही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यास तयार आहोत. आम्हाला सोबत घेतले तर महायुतीतून आम्ही निवडणुका लढू, सोबत
घेतले नाही तर आम्ही स्वबळावर
लढू, असे आमदार मेटे यांनी
सांगितले. खासदार शेट्टी म्हणाले की, महायुतीच्या घटकपक्षांबाबत आगामी निवडणुकांसंदर्भात समन्वय समितीने बैठक घेऊन चर्चा
करणे गरजेचे होते. अद्याप
त्याबाबत समन्वय समितीची बैठक झाली नाही.
महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्ष एकमेकांना मदत करणार आहेत; मात्र, महायुती झाली नाही, तर प्रत्येक पक्षाला स्वत:चा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. शिवसेना व भाजपा
या दोन मोठ्या पक्षातच अद्याप
युती होत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये महायुती अस्तित्वात येऊ शकेल असे वाटत नाही.
त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये स्वाभिमानी पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार आहे. (प्रतिनिधी)
>राजने ताळतंत्र सोडले
शिवस्मारकाबाबत राज ठाकरे केवळ प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्यांनी ताळतंत्र केव्हाच सोडले आहे. त्यांना खरोखर माहिती हवी असल्यास ती आपणाकडून घ्यावी. आपण त्यांना हवी ती माहिती देऊ, असे आमदार विनायक मेटे यांनी सांगितले.