नियम पाळा अन सेल्फी काढा
By admin | Published: April 20, 2016 02:00 AM2016-04-20T02:00:45+5:302016-04-20T02:00:45+5:30
सेल्फीचा मोह तर सर्वांनाच होतो. त्याला केंद्रबिंदू ठेवून ठाणे शहर वाहतूक शाखेने नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे कौतुक करून त्याचा पोलिसांसोबत एक सेल्फी काढण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे
पंकज रोडेकर, ठाणे
सेल्फीचा मोह तर सर्वांनाच होतो. त्याला केंद्रबिंदू ठेवून ठाणे शहर वाहतूक शाखेने नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे कौतुक करून त्याचा पोलिसांसोबत एक सेल्फी काढण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे कोणाला याचे नवल वाटण्याचे कारण नाही. याचे तुम्ही साक्षीदार होऊ शकतात. वाहतुकीचे नियम पाळा आणि पोलिसांसोबत सेल्फी काढा, असे म्हटले जात आहे.
वाहतुकीचे नियमांचे पालन केल्याबद्दल कौतुकीची थाप म्हणून त्या चालकाला थँक्यू उद्गार लिहीलेले एक कार्डही दिले जाणार आहे. तसेच त्याचा क्लिक केलेला तो अनोखा क्षण पोलिसांच्या व्हॉटस्अॅप ग्रुपसह फेसबुकवर ही झळकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरात सद्यस्थिती वाहतुकीचे नियम अक्षरश धाब्यावर बसवले जातात. यामध्ये विना हेल्मेट, सीटबेल्ट नसणे, सिग्नल तोडणे, मद्यप्राशन करून वाहन हाकणे अशाप्रकारचे नियमांची पायमल्ली होताना दिसते. त्यांच्याविरोधात वाहतूक पोलिसांनी वारंवार कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे वाहतूक पोलीस आणि चालकांमध्ये नित्यनियमाने खटके उडताना दिसतात. एवढेच नाही खटक्यांचे पर्यवसान हाणामारीतही झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. याचदरम्यान, ठाणे शहर वाहतूक शाखेने हा अनोखा उपक्रम एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हाती घेतला आहे. यामध्ये ठाणे शहरात वाहन चालवताना नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकाला थँक्यू असे उद्गार काढून त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शहरातील कोपरी, ठाणेनगर, वागळे इस्टेट, नौपाडा, कापुरबावडी, कासावडवली आदी वाहतूक शाखेच्या उपशाखांमधील नाकानाक्यांवरील सिग्रलला वाहन थांबल्यावर मिळणार काही क्षणाच्या वेळेत, फोटो क्लिक करणे हे प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले आहे. तसेच तो फोटो वाहतूक पोलिसांच्या सोशल मिडीयावर अपलोड करुन नियम पाळणाऱ्यांची नवीन ओळख म्हणून यामाध्यमातून पुढे आणण्याचा वाहतूक शाखेचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.