कोल्हापुरात ‘फौंड्री आॅन जॉब’
By admin | Published: November 8, 2016 04:53 AM2016-11-08T04:53:03+5:302016-11-08T04:53:03+5:30
शिक्षा भोगल्यानंतर बंदिजनांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात ‘तांत्रिकी’ पाऊल टाकण्यात आले आहे.
संतोष मिठारी, कोल्हापूर
शिक्षा भोगल्यानंतर बंदिजनांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात ‘तांत्रिकी’ पाऊल टाकण्यात आले आहे. या ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतन, कारागृह प्रशासन, तसेच घाटगे-पाटील इंडस्ट्रिजतर्फे गेल्या सहा महिन्यांपासून ‘फौंड्री आॅन जॉब’ उपक्रम राबविला जात आहे. त्यातून बंदिजन दिवसाकाठी सुमारे ३५ टन कास्टिंग्जचे फिनिशिंग, फेटलिंगचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे, या उपक्रमाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत येथे पूर्णत: ‘झीरो रिजेक्शन’ उत्पादनाची निर्मिती झाली आहे. तांत्रिक कौशल्य देऊन कैद्यांचे पुनर्वसन करण्याबाबतचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.
बंदिजनांमध्ये कौशल्य विकास साधण्याच्या दृष्टीने कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासन, घाटगे-पाटील इंडस्ट्रिज आणि शासकीय तंत्रनिकेतन यांनी तीन वर्षांसाठी सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत बंदिजन, कैद्यांसाठी मेमध्ये ‘फौंड्री आॅन जॉब’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये एकूण ६० कैद्यांच्या हातांना ट्रॅक्टर कास्टिंग्जच्या फिनिशिंगसह फेटलिंग (बर काढणे) करण्याचे काम मिळाले आहे. हे काम करून घेत, त्यातूनच या कैद्यांना त्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. काही दिवसांत या कैद्यांनी फेटलिंगच्या विविध स्वरूपांतील कामांत प्रावीण्य मिळविले आहे.
औद्योगिक वसाहतींमधील कामगारांपेक्षा येथील उत्पादन, कामाची गुणवत्ता चांगली आहे. गेल्या सहा महिन्यांत या कैद्यांकडून ‘झीरो रिजेक्शन’ काम झाले आहे. त्यांनी फेटलिंग केलेल्या एकाही सुट्या भागावर कंपनीला पुन्हा काम करावे लागलेले नाही. कामाची गुणवत्ता लक्षात घेऊन, येथे कार्यरत कैद्यांची संख्या शंभर करून दोन शिफ्ट सुरू करण्याचा विचार कारागृह प्रशासनाचा सुरू आहे. कामाच्या मोबदल्यातून कुटुंबीयांसाठीही त्यांना काही पैसे पाठविता येतात.
सुरुवातीला दिवसाकाठी अवघ्या २६-२७ इतक्या होणाऱ्या सुट्या भागांचे काम आता ४५० पर्यंत पोहोचले आहे. रोज सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत येथे ३५ टन कास्टिंग्जच्या फेटलिंगचे काम होते. जॉन डीअर, आयशर, एस्कॉर्ट, आदी ट्रॅक्टर उत्पादकांना लागणाऱ्या क्लच हाउसिंग, आर. ए. हाउसिंग, आयशर थ्री बोअर, फ्रंट केस, इटॉन केस, रिअर केस अशा विविध २३ सुट्या भागांच्या फिनिशिंगसह फेटलिंगचे काम अत्यंत अचूक स्वरूपात या कैद्यांकडून होते.
त्यांना तांत्रिक स्वरूपातील मार्गदर्शनासाठी या ठिकाणी घाटगे-पाटील इंडस्ट्रिजचे एक पर्यवेक्षक आणि दोन जॉब इन्स्पेक्टर कार्यरत आहेत.
कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके, वरिष्ठ तुरुंगाधिकारी चंद्रकांत आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.