अन्न, औषध प्रशासनाचे आधुनिकीकरण होणार

By admin | Published: August 2, 2015 02:34 AM2015-08-02T02:34:20+5:302015-08-02T02:34:20+5:30

राज्यातील ११ कोटी जनतेला स्वच्छ, सुरक्षित अन्न मिळावे, चांगल्या प्रतीची औषधे मिळावीत यासाठी स्वतंत्ररीत्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यरत असते. सर्वांच्या आरोग्यासाठी

Food and drug administration will be modernized | अन्न, औषध प्रशासनाचे आधुनिकीकरण होणार

अन्न, औषध प्रशासनाचे आधुनिकीकरण होणार

Next

राज्यातील ११ कोटी जनतेला स्वच्छ, सुरक्षित अन्न मिळावे, चांगल्या प्रतीची औषधे मिळावीत यासाठी स्वतंत्ररीत्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यरत असते. सर्वांच्या आरोग्यासाठी दिवसरात्र ही यंत्रणा सतर्क राहून गैरप्रकार रोखत असते. मॅगीत आढळलेल्या एमएसजी, माव्यात झालेली भेसळ असो अथवा नकली औषधांचा प्रश्न या सर्वांवर एफडीएला लक्ष ठेवावे लागते. एफडीएसमोर असलेली आव्हाने, त्यांचे प्रश्न, एफडीएचे अत्याधुनिकीकरण यासंदर्भात एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याशी ‘कॉफी टेबल’च्या निमित्ताने त्यांनी केलेली ही बातचीत...

एफडीएची यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी आपण सध्या कोणती पावले उचलत आहात?
डिव्हिजनप्रमाणे एफडीएच्या प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी एकूण १२५ कोटी खर्च येणार आहे. डिसेंबरमधल्या आर्थिक तरतूदीत ३० ते ४० कोटी रुपये मंजूर होऊ शकतात. यात मुंबईतील कार्यालयात प्रयोगशाळेसाठी एक मजला वाढवण्यात येणार आहे. मुंबई आणि औरंगाबाद प्रयोगशाळा अद्ययावत करुन घेतली जाणार आहे. आवश्यक उपकरणे विकत घेतली जाणार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अमरावती, नाशिक, पुणे, येथे देखील तंत्रज्ञान आणण्यात येईल. अद्यायावत यंत्रणा आल्यावर फूड अ‍ॅनॅलिस्टची पदे वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यावरही चर्चा सुरु आहे. एफडीए अधिकाऱ्यांना नवीन गोष्टींविषयी ज्ञान मिळावे, यासाठी त्यांच्या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.
गुटखाबंदी वाढवली, त्याबाबत काय सांगाल...
एफडीएने राज्यात पुन्हा एक वर्ष गुटखाबंदी घातली आहे. या वर्षीच्या गुटखाबंदीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आधी ‘चघळण्याच्या तंबाखू’वर बंदी असे म्हटले होते. आता त्यात एक शब्द वाढवण्यात आला आहे, ‘उत्पादित चघळण्याच्या तंबाखू’वर बंदी असे म्हटले आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या छुप्या पद्धतीने होणाऱ्या विक्रीला आळा घालण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये धाडी घालण्यास सुरुवात केली आहे. नागपूर येथे सध्या ५० ते ५५ भरारी पथके सज्ज आहेत. माहिती मिळताच ते वेळोवेळी धाडी घालत आहेत. एका दिवसात एकाच वेळी या धाडी घातल्या जात आहेत. पुढच्या टप्प्यात मुंबई आणि इतर मोठ्या शहरात धाडी घातल्या जाणार आहेत.
चिक्की प्रकरणात काय आढळून आले?
सरकारी चिक्कीचे नमुने एफडीएने तपासले होते. पण ती चिक्की खाण्यायोग्य नसल्याचे आढळून आले. अखाद्य चिक्कीमध्ये वाळूचे कण सापडले होते. चिक्कीचे नमुने वेगवेगळ्या ठिकाणांहून न ठरवता उचलण्यात आले होते.
उत्पादनांच्या जाहिराती कितपत खऱ्या अथवा फसव्या असतात?
उत्पादनांच्या ज्या जाहिराती केल्या जातात, त्यासाठी कंपन्यांना वैज्ञानिक पुरावे द्यावे लागतात. अनेकदा सडपातळ होण्याची औषधे जाहिराती करून विकली जातात. पण या उत्पादनांची नोंदणी केलेली नसते. जाहिरात केल्याच्या काही महिन्यांतच ते उत्पादन बाजारातून काढून घेतले जाते. तेच उत्पादन नंतर दुसऱ्या नावाने बाजारात आणण्यात येते. यामुळे आधीच्या उत्पादनाचा शोध घेणे कठीण बनून जाते.
मॅगीच्या तपासण्यांनंतर आणखी कोणत्या उत्पादनांवर एफडीएची नजर आहे?
सध्या हल्दीरामच्या उत्पादनांचे २० नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या उत्पादनांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे का? याची तपासणी करण्यात येत आहे. त्याचे अहवाल आल्यावर पुढची कारवाई ठरवण्यात येईल.
आॅनलाइन विक्रीमुळे एफडीएसमोर कोणती आव्हाने निर्माण झाली आहेत?
आॅनलाइन साइट्सवर होणारी औषधांची विक्री हा एक नवीन प्रकार सध्या सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीच एफडीएकडे आलेल्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्यात आली. पण अशा प्रकारच्या विक्रीमध्ये कारवाई करणे कठीण जाते. कारण, विक्री महाराष्ट्रात होत असली तरी व्यवसाय करणारे दुसऱ्या राज्यातील असतात, अथवा साठवणूक दुसऱ्या राज्यात केली जाते. यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे पटकन शक्य होत नाही. हा प्रश्न फक्त देशपातळीवरचा नाही तर जागतिक पातळीवरचा आहे. जागतिक पातळीवर दोन हजार साइट्सना बंदी घालण्यात आली आहे. भारतातही या प्रकरणासंदर्भात एकत्र येऊन कसे काम करता येईल याचा विचार सुरू आहे. आॅनलाइन विक्रीवर आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.
अधिकाऱ्यांना कारवाई करताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते?
आॅनलाइन साइट्सवर विक्री करणे हा प्रकार नवीनच आहे. यामुळे यातील बारकावे शोधून काढणे, त्या अनुषंगाने कारवाई करणे, यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांचे ज्ञान अद्ययावत केल्यास त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी कमी होतील. यासाठी एफडीए अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
दूधभेसळ प्रकरणी एफडीए कसे सक्रिय आहे?
दूध हा सर्वांच्या अन्नातील अविभाज्य घटक आहे. कोणत्याही पदार्थांमध्ये भेसळ होणे हे अयोग्यच. सर्वांना सुरक्षित अन्न मिळणे हा सर्वांचा हक्क आहे. मध्यंतरी आम्ही दुधाचे टँकर तपासले होते. त्या वेळी आम्हाला सापडलेल्या एकाही नमुन्यात भेसळ आढळली नाही. पण विक्रीच्या पुढच्या टप्प्यात दूध भेसळीचे प्रकार घडत असतात. याला रोखण्यासाठी दूधपट्टीचा वापर आम्ही लवकरच करणार आहोत. येत्या काही दिवसांत बाजारांत या दूधपट्ट्या उपलब्ध होणार आहेत. या दूधपट्ट्यांचा वापर करून दुधातील भेसळ तपासता येणार आहे.
सध्या एफडीएमध्ये तुलनेने कमी अन्नसुरक्षा अधिकारी आहेत. या दूधपट्टीमुळे घराघरांत अन्नसुरक्षा अधिकारी निर्माण होतील.
फार्मासिस्टचा प्रश्न कसा मार्गी लावणार?
औषधांच्या दुकानामध्ये फार्मासिस्ट असणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती बदललेली आहे. आधी एकाच फार्मासिस्टच्या नावावर दोन अथवा तीन दुकाने असायची. पण ही पद्धत आता बंद झाली आहे. आमच्याकडे ४८ हजार ४०० फार्र्मासिस्टची नोंदणी आहे. यामुळे सध्या एका फार्मासिस्टच्या नावावर एकच दुकान आहे. त्याचबरोबरीने प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देण्याच्या प्रमाणातदेखील घट झाली आहे. अनेकदा फार्मासिस्टना काही नियम नीटपणे माहीत नसल्यामुळे त्यांच्याकडून चुका होतात. यामुळे पुढच्या काळात एफडीएतर्फे फार्मासिस्टना प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. सध्या काम करत असणाऱ्या फार्मासिस्टना एका दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर बी. फार्मासिस्टचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचबरोबर त्यांना प्रमाणपत्रदेखील देण्यात येणार आहे.
रस्त्यावरील अन्न पदार्थांवर कशी कारवाई करता?
रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी एफडीएची नियमावली आहे. त्याचे पालन करणे गरजेचे आहे. मध्यंतरी ५९ खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. पण प्रत्येक वेळी एफडीए अधिकाऱ्यांना कारवाई करणे शक्य होत नाही. यामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यास पालिकेने मदत करावी, असे आमच्यातर्फे पालिकेला सांगितलेले आहे. कारवाई करण्यासाठी लागणारी क्षमता त्यांच्याकडे आहे. आमच्याकडे असणारे मनुष्यबळ त्या तुलनेने कमी आहे. काही ठिकाणी जाऊन आम्ही कारवाई करत असतो. पण चांगल्या पद्धतीने याची अंमलबजावणी होण्यासाठी पालिकेने साथ दिली पाहिजे.
स्टेण्टच्या वाढत्या किमतीवर कसे नियंत्रण आणता येईल?
तरुण वयातच हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. अ‍ॅन्जिओप्लास्टिमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टेण्टच्या किमती अनेकदा किती अव्वाच्या सव्वा सांगितल्या जातात. यासंदर्भात आमच्याकडे तक्रार आल्यावर एफडीएकडून कारवाई केली होती. यानंतर रुग्णालयांना नोटीस पाठवल्यावर काही ठिकाणी स्टेण्टच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. पण अजूनही काही रुग्णालयांमध्ये स्टेण्टच्या किमती कमी झालेल्या नाहीत. अशा रुग्णालयांची एफडीए चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे.
कृत्रिमरीत्या पिकविल्या जाणाऱ्या फळांवर कारवाई कशी होते?
आंब्याच्या सिझनमध्ये आंबा पिकवण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी झाले आहे. आंबा पिकवण्यासाठी त्यांनी विशेष केंद्रे उभी केली आहेत. या केंद्रांमध्ये आंबा पिकवण्यास कायदेशीर परवानगी आहे. त्याचप्रमाणे मुंबईसारख्या ठिकाणी रेल्वे रुळांच्या बाजूला पिकणाऱ्या भाज्यांची चाचणी करून त्यांचा दर्जा तपासण्याचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
सण-उत्सवाच्या काळात कोणती विशेष काळजी घेणार?
सण-उत्सवाच्या काळात गोड पदार्थांची विक्री जास्त प्रमाणावर होते. अनेक पदार्थांमध्ये माव्याचा वापर केलेला असतो. मागणी वाढल्याने भेसळ होण्याच्या प्रमाणात वाढ होते. यामुळे सण-उत्सवाच्या काळात विशेष लक्ष दिले जाणार आहे. अजून कारवाई सुरू केलेली नाही. पण लवकरच राज्यभरात कारवाई सुरू करण्यात येणार आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या खाद्यपदार्थांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
कुंभमेळ्यासाठी काही विशेष मोहीम...
नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू आहे. कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होतात. यासाठीही त्या भागातील अधिकाऱ्यांच्या हाती विशेष काम सोपवण्यात आले आहे. याचबरोबर याआधी नाशिकमध्ये काम केलेल्या अनुभवी अधिकाऱ्यांना कुंभमेळ्यासाठी तेथे बोलावून घेतले आहे.
एफडीएचे आव्हान गावांत की शहरांत?
गावांच्या तुलनेत शहरांची लोकसंख्या जास्त असते. त्यामुळे इथेच ग्राहकांची संख्या प्रचंड अधिक असते. ग्राहकांचे प्रमाण जास्त असल्याने भेसळीचे प्रमाणही गावांच्या तुलनेत शहरात जास्त असते. त्यामुळे एफडीएचे लक्ष मुख्यत: शहरांकडेच असते.
ग्राहकांनी कशा पद्धतीने जागरूक राहायला हवे?
एफडीएला सामान्य ग्राहकांनी साथ दिली, तर घडणाऱ्या अनधिकृत प्रकरणांना आळा घालणे सहज शक्य होईल. ग्राहकांनी औषध आणि अन्न खरेदी करताना सजग राहण्याची आवश्यकता आहे. औषधामध्ये महत्त्वाचे असणारे कम्पोनंट औषधाच्या पाकिटावर मोठ्या अक्षरात लिहिलेले असते. ते नाव आणि प्रिस्क्रिप्शनवरील लिहिलेले नाव सारखे आहे ना? हे तपासून पाहावे. औषध आणि अन्न घेताना जनजागृतीमुळे एक्सपायरी डेट पाहिली जाते. पण काही खाद्यपदार्थांवर एक्सपायरी डेट नसते, कालावधी (३ महिने, ६ महिने इत्यादी) असा लिहिलेला असतो. तो तपासून घेतला पाहिजे. पॅक्ड फूडवर अन्नपदार्थात असलेल्या जिन्नसांचा उल्लेख करणे बंधनकारक असते. हे जिन्नस तपासून घेतले पाहिजेत. अनेकदा ग्राहक तक्रारी करत असतात, आमच्या भागात दुधात भेसळ होते, इतर पदार्थ निकृष्ट दर्जाचे असतात. या वेळी ग्राहकांनी एफडीएच्या १८०० २२२ ३६५ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदविली पाहिजे. उघड्यावरचे बाहेरचे पदार्थ खाणे आरोग्यास हानिकारक आहे, हे सर्वांनाच माहीत असते. त्यामुळे स्वस्त अन्नपदार्थ मिळतात म्हणून रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नयेत.


शब्दांकन : पूजा दामले

Web Title: Food and drug administration will be modernized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.