राज्यातील चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 02:43 PM2019-07-31T14:43:22+5:302019-07-31T14:47:32+5:30
दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बारामती : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बारामती तालुक्यातील जवळपास १५ हजार पशुपालकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे त्या भागातील पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न नजीकच्या कालावधीत निर्माण होण्याची शक्यता आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी शासन निर्णयान्वये जनावरांच्या चारा छावण्या उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यासाठी कालावधी लागणार आहे. परिणामी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्या ऑगस्टअखेर सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्यात अद्याप मॉन्सूनचा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने चारा छावण्यांची मुदत वाढविण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. बुधवारी(दि. ३१) चारा छावणीची शेवटची मुदत असल्याने पशुपालक शेतकरी चिंताग्रस्त होते. त्यामुळे चारा छावणीची मुदत पुन्हा वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे.
राज्यात दुष्काळी भागात जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांची मुदत वाढविण्यात आली आहे.बारामती तालुक्यात १४ छावण्यांमध्ये १५ हजार जनावरे आहेत. बारामती दूध संघ, कृषि उत्पन्न बाजार समिती, माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, बारामती खरेदी विक्री संघ, खंडू खैरेवाडी येथील राजे प्रतिष्ठान, धो.आ. सातव उर्फ कारभारी अण्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तालुक्यात चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत.
..
चारा टंचाईने हैराण झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले की, येथील पशुउत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. शेतकºयांनी याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. पवार यांनी राज्य पातळीवर केलेल्या मागणीला यश आले आहे. यापूर्वी देखील जूनअखेर असणारी चारा छावणीची मुदत पवार यांच्या मागणीमुळे वाढवून मिळाल्याचे होळकर म्हणाले.