अन्न, नागरी पुरवठा विभागाला काळाबाजार ‘माहीत नाही’
By admin | Published: December 6, 2015 01:06 AM2015-12-06T01:06:06+5:302015-12-06T01:06:06+5:30
डाळीचे दर गगनाला भिडल्यावर त्याचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले. तरीही अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्रालयाकडे याविषयी कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे उघड
मुंबई : डाळीचे दर गगनाला भिडल्यावर त्याचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले. तरीही अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्रालयाकडे याविषयी कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. काळा बाजार करणाऱ्यावर केलेल्या कारवाईची माहिती अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात मागितली होती. त्याला उत्तर देताना कोणत्याही प्रकारची उत्तर देण्यात आलेली नाहीत.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे ५ नोव्हेंबर रोजी राज्यातील धाडी अंतर्गत जप्त केलेली डाळ, बाजार मूल्य आणि फौजदारी गुन्हा दाखल केला असल्यास कारवाईची माहिती कार्यकर्त्याने विचारली होती. प्रवीण नलावडे, अवर सचिव तथा जन माहिती अधिकारी यांनी यावर असे कळवले की, राज्यातील धाडी अंतर्गत जप्त केलेली डाळ, बाजार मूल्य, साठा मर्यादा भंगाबाबत दुकानदार/ साठेबाज यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती, दंडात्मक कार्यवाही, दंडाची रक्कम व संबंधित पोलीस स्टेशनची माहिती उपलब्ध करून देणे, याबाबतच्या माहितीचे संकलन व पृथक्करण जिल्हाधिकारी तसेच नियंत्रक शिधावाटप व संचालक, मुंबई यांच्या कार्यालयाकडून केले जाते. त्यामुळे शासन परिपत्रक
६ सप्टेंबर २००८मधील तरतूद पाहता ही माहिती गोळा करून देणे अभिप्रेत नाही. तरी आपण संबंधित कार्यालयाकडून सदर माहिती उपलब्ध करून घ्यावी.