सरकारी वसतिगृहात अन्नविषबाधा
By Admin | Published: January 11, 2015 01:14 AM2015-01-11T01:14:20+5:302015-01-11T01:14:20+5:30
आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत असलेल्या तलासरी येथील सरकारी मुलींच्या वसतिगृहातील ३२ मुलींना शुक्रवारी संध्याकाळी अन्नातुन विषबाधा झाली.
तलासरी : आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत असलेल्या तलासरी येथील सरकारी मुलींच्या वसतिगृहातील ३२ मुलींना शुक्रवारी संध्याकाळी अन्नातुन विषबाधा झाली. त्यांना तलासरी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पअधिकारी डी. आर. नेरकर यांनी सांगितले.
तलासरी येथे मुलींचे सरकारी वसतिगृह असून यामध्ये १२५ आदिवासी मुली शिक्षण घेत आहेत. या वसतिगृहातील मुलींना जेवल्यानंतर मळमळल्यासारखे होऊन उलट्या-जुलाब सुरू झाले. वसतिगृहाच्या अधिक्षक विजया क्षीरसागर यांनी बाधीत ३२ मुलींना तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तलासरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राजेश खेमणार यांनी तात्काळ उपचार सुरू करून ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना दाखल करून घेतले आणि बाकीच्या मुलींना उपचारांनंतर सोडले.
दाखल केलेल्या विद्यार्थिनींमध्ये स्वप्नाली सुरेश शिंगडा (१७), वैशाली लक्ष्मण चौधरी (१६), सावित्री दिलीप दुमाडा (१७), सुरेखा जाना गिंभल (१८), योगिता महादु चौधरी (१७), उज्वला लक्ष्मण गोरखना (१८), गिता जयराम भगत (१६), सुनिता बारक्या रोडका (१७) यांचा समावेश आहे.
उर्वरीत मुलींवर उपचार करून सोडण्यात आले. या वसतिगृहातील मुलींना अन्न शिजवून खाऊ घालायचा ठेका ‘स्वामीनी महिला बचत गट’, जव्हार यांना देण्यात आला आहे. या बचत गटाने वेगवेगळ्या ठिकाणी भोजनाचे ठेके घेतले आहेत. वेगवेगळ््या ठेकेदारांमार्फत हे भोजन पुरविले जाते. यासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)
च्शासकीय वसतिगृहातील मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याचे समजताच डहाण्ूा उपविभागीय अधिकारी अंजली भोसले, तलासरी तहसिलदार गणेश सांगळे, डहाणू विधानसभेचे आमदार पास्कल धनारे यांनी वस्तीगृहाला भेट देऊन माहिती घेतली.
च्तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलींनी तीन-चार दिवसांपासून जेवणानंतर आम्हाला असाच त्रास होत असल्याची माहिती दिली. तर जेवणातील अनियमतता व अपचन यामुळे मुलींना उलट्या जुलाब झाल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले.