अन्नधान्यात घट, ऊसक्षेत्रात वाढ !
By admin | Published: March 18, 2016 04:03 AM2016-03-18T04:03:10+5:302016-03-18T04:03:10+5:30
भीषण दुष्काळ, अकाली पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्याच्या उत्पादनात यंदा २४.९ टक्के घट झाली असून कापूस, तेलबिया, फळांच्या उत्पादनात प्रचंड घसरण झाली आहे.
मुंबई : भीषण दुष्काळ, अकाली पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्याच्या उत्पादनात यंदा २४.९ टक्के घट झाली असून कापूस, तेलबिया, फळांच्या उत्पादनात प्रचंड घसरण झाली आहे. मात्र, एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे सर्वाधिक पाणी लागणाऱ्या उसाचे क्षेत्र तब्बल १९ टक्क्यांनी वाढले आहे. राज्याच्या कृषी विकासाचा दर आगामी वर्षात २.७ टक्क्यांनी घसरेल, अशी चिंता महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
२०१५-१६ च्या वार्षिक आर्थिक पाहणीचा अहवाल वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. उद्योग क्षेत्राच्या मूल्यवृद्धीत ५.९ टक्के तर सेवा क्षेत्रात १०.८ टक्के वाढ झाली असताना कृषी व संलग्न क्षेत्राच्या स्थूल मूल्यवृद्धीत पुढील वर्षी २.७ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. कृषी उत्पादन घटल्याने पडलेला खड्डा उद्योग, सेवा क्षेत्राने भरून काढल्याचे दिसते. राज्याचा विकास ५.८ टक्क्यांवरून ८ टक्के इतका झाला आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही विकासाचा दर वाढला हे सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाचे फलित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उद्योग क्षेत्रातील मूल्यवृद्धीचा दर ५.९ टक्के इतका असल्याचे आर्थिक पाहणीत म्हटले आहे. तृणधान्ये व कडधान्यांच्या उत्पादनात अनुक्रमे १८.७ टक्के व ४७ टक्के घट झाली. कापूस व तेलबिया आणि फळभाज्यांचे उत्पादन अनुक्रमे ५९.५ टक्के, ५२.८ टक्के आणि १५ टक्के इतके घटले. सलग दुसऱ्या वर्षी राज्याचा कृषी दर कमालीचा घटला आहे.
दूध व्यवसाय संकटात
कृषी क्षेत्राशी निगडित दूध व्यवसायदेखील कमालीचा संकटात आल्याचे सर्वेक्षणावरून स्पष्ट होते. ४३ टक्के सहकारी दूध संस्था आणि ५१ टक्के दूध संघ तोट्यात आहेत. एकूण २४ टक्के सहकारी संस्था तोट्यात असून त्यातील २२ टक्के संस्था कृषी पतपुरवठा करणाऱ्या आहेत.