२२ मजुरांना अन्नातून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 07:27 PM2016-10-16T19:27:10+5:302016-10-16T19:27:10+5:30
जिगाव प्रकल्प येथे काम करणा-या २२ मजुरांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. बाधीत रुग्णांवर स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले
Next
>ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. 16 - जिगाव प्रकल्प येथे काम करणा-या २२ मजुरांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. बाधीत रुग्णांवर स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नांदुरा तालुक्यातील जिगाव येथे प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पावर परप्रांतीय मजुर कामासाठी आले आहेत. कामावरील मजुरांना दररोज मेसचे जेवण देण्यात येते. रविवारी सकाळी मजुरांनी जेवण केल्यानंतर त्यांना मळमळ होणे. पोट दुखणे, अंग खाजवणे, ताप आदी त्रास सुरु झाले. सुमारे २२ मजुरांना एकाचवेळी त्रास सुरु झाल्यामुळे संबंधित कंत्राटदाराने सर्व मजुरांना स्थानिक सामान्य रुग्णालयात दुपारच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी सर्वांची तपासणी करुन त्यांना दाखल केले. रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दाखल करण्यात आलेल्या रुग्णामध्ये मो.एजाज.मो.आलेम (वय २८), राजेशसिंह रामराजन (वय १७), निलेश श्रीकामता प्रसाद (वय १२), महेश इमामसिंग मोहरे (वय २०), सोनू प्रल्हाद साकेत (वय २४), अताहुसैन (वय २२), हरिप्रसाद श्रीराम कसब (वय १९), बेलाम अहमद (वय २३), दिलशाद महमंद (वय २०), दादुसिंग दिलराजसिंग (वय २५), रामचंद्र रामरतन यादव (वय १९), अशोकपाल श्रीपाद (वय २३) सत्येंद्र लालूप्रसाद (वय २५), जितेंद्र राम (वय २०), दुलम बहरीया (वय २०), रामु मोहीम रामविलास (वय १८), महेंद्रसिंग बहादुरीया (वय २३), जलालुद्दीन रहेमोद्दीन (वय १८), कैसरअली नवाजोद्दीन (वय १९), हे सर्व रा.जि.सिंगरोली मध्यप्रदेश तर उदय सुरेश गुडपल्ली (वय २१) अजय आनजी नायडू (वय २२) रा.मध्यप्रदेश यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)
बोअरचे पाणी पिल्यामुळे त्रासाची शक्यता-
जिगाव प्रकल्पावर चारशेच्या जवळपास मजुर कामावर आहेत. राज्यातील मजुराबरोबर येथे मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातील मजुरांचाही समावेश आहे. या मजुरांना जेवणासाठी मेसची व्यवस्था केलेली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी बोअरमधील पाण्याचा वापर केल्या जातो. नवीन बोअरचे पाणी पिल्यामुळे पोटात त्रास वाढल्याचे बाधीत रुग्णांनी सांगितले. मजुरांसाठी पिण्याचे पाणी बोअरमधून टँकरमध्ये तर टँकरमधून पाण्याच्या टाक्यात टाकले जाते. बोअरच्या पाण्याची योग्य फिल्टर न झाल्यामुळे मजुरांना त्रास वाढल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर-
जेवण झाल्यानंतर अन्नातून विषबाधा तसेच बोअरचे पाणी पिल्याने मजुरांना त्रास वाढला. त्यांना तात्काळ स्थानिक सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करुन उपचार सुरु केले आहेत. सर्व मजुरांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली.