रेल्वे गाड्यांतील ‘पॅन्ट्री कार’ची होणार फूड तपासणी, रेल्वे बोर्डाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 07:25 PM2019-03-14T19:25:38+5:302019-03-14T19:25:47+5:30
रेल्वे गाड्यांमध्ये ‘पॅन्ट्री कार’मधून प्रवाशांना दिले जाणारे जेवण, चहा, कॉफीसह डबाबंद खाद्यपदार्थांची तपासणी केली जाणार आहे.
अमरावती - रेल्वे गाड्यांमध्ये ‘पॅन्ट्री कार’मधून प्रवाशांना दिले जाणारे जेवण, चहा, कॉफीसह डबाबंद खाद्यपदार्थांची तपासणी केली जाणार आहे. रेल्वे बोर्डाने त्याअनुषंगाने विभागीय स्तरावर पत्रव्यवहार चालविला असून, रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याकरिता स्वतंत्र पथक गठित करण्यात आले आहे.
इंडियन रेल्वे टुरिझम कार्पोरेशनच्या माध्यमातून रेल्वे प्लॅटफार्म, प्रवासी गाड्यांमधील ‘पॅन्ट्री कार’मधून खाद्य पदार्थ, चहा, कॉफी, शीतपेय, जेवण आदी प्रवाशांच्या निगडित सोईसुविधा पुरविल्या जातात. मात्र, ३६ ते ४८ तास असा लांब पल्ल्याचा प्रवास असलेल्या रेल्वे गाड्यांच्या ‘पॅन्ट्री कार’मध्ये फूड खरेचं सुरक्षित आहे काय? याचा शोध घेतला जाणार आहे. रेल्वे बोर्डाने प्रवाशांचे आरोग्य, सुरक्षिततेसाठी लागू केलेल्या नियमावलींचे पालन ‘पॅन्ट्री कार’चे संचालक करतात किंवा नाही? हे वाणिज्य विभागाचे फिरते पथक धाडसत्र राबवून तपासणी करणार आहेत. दिल्ली येथील रेल्वे बोर्डाकडे प्राप्त तक्रारीच्या आधारे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये ‘पॅन्ट्री कार’चे फूड तपासणीचे आदेश देण्यात आले आहे. वाणिज्य विभागाने धाडसत्र राबविताना रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूलादेखील सुरक्षेच्या अनुषंगाने सोबत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मध्य रेल्वे भुसावळ विभागात धडकले आदेश
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये ‘पॅन्ट्री कार’ची फूड तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याबाबतचे आदेश मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या मुख्य वाणिज्य प्रबंधकांकडे धडकले आहे. यात दिल्ली येथील रेल्वे बोर्डाकडे प्राप्त तक्रारींचा दाखला देण्यात आला आहे. त्यामुळे भुसावळ, नागपूर मार्गे ये-जा करणाºया लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील ‘पॅन्ट्री कार’ची फूड तपासणी केली जाणार आहे. दिल्ली, मुंबई, चैन्नई, अहमदाबाद, हावडा मार्गे ये-जा करणाºया रेल्वे गाड्यांना लक्ष्य केले जाईल.
ऑनलाईन पाठवावा लागेल अहवाल
रेल्वे गाड्यांच्या ‘पॅन्ट्री कार’मध्ये फूडची तपासणी करून वाणिज्य निरीक्षकांना हा अहवाल वरिष्ठांकडे आॅनलाईन पाठवावा लागणार आहे. गाडी क्रमांक, पॅन्ट्री कारचे संचालक वजा कंत्राटदार, फूड संदर्भात प्रवाशासोबतचा संवाद, खाद्य पदार्थाचा दर्जा, स्वच्छता, पॅन्ट्री कारमधील कर्मचाºयांचे राहणीमान, प्रवाशांसोबत त्यांची वागणूक, गाडीचा थांबा आदी १२ विषयांवरील मूल्यांकनाचा अहवाल आॅनलाईन पाठविणे अनिवार्य आहे. वाणिज्य विभागाचे वरिष्ठांसह इंडियन रेल्वे टुरिझम कार्पोरेशनकडे हा अहवाल आॅनलाईन पाठवावा लागणार आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना चांगल्या दर्जाचे खाद्य पदार्थ, शुद्ध पाणी, जेवण मिळावे, यासाठी ‘पॅन्ट्री कार’ची फूड तपासणी केली जाईल. वाणिज्य विभागाची ती मुख्य जबाबदारी आहे. किंबहुना वरिष्ठांचे पत्रदेखील प्राप्त झाले असून, लवकरच तपासणी करून वरिष्ठांना अहवाल पाठविला जाईल.
- शरद सयाम,
मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक, बडनेरा