मुंबईसह राज्यभरात किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन
By admin | Published: March 20, 2017 03:16 AM2017-03-20T03:16:24+5:302017-03-20T03:16:24+5:30
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी रविवारी राज्यभरातील शेतकऱ्यांनी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन
मुंबई : सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी रविवारी राज्यभरातील शेतकऱ्यांनी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनात मुंबईतील किसानपुत्रही सहभागी झाले होते.
शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी अन्नदान आंदोलनासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्याला राज्यभरासह मुंबई व उपनगरातील किसानपुत्रांनीही साथ दिली.
मुंबईसोबतच उपनगरात राहाणाऱ्या किसानपुत्रांनी दिवसभर उपवास केला. त्यानंतर, संध्याकाळी मनोरा आमदार निवासाच्या समोरच्या हिरवळीवर एकत्र येत, सरबत पिऊन उपवासाची सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे, या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या घोषणा किंवा भाषण न करता, शांततापूर्ण मार्गाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली, तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
३१ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजे, १९ मार्च रोजी साहेबराव करपे या यवतमाळमधील चिलगव्हाणच्या शेतकऱ्याने कुटुंबासह आत्महत्या केली होती. जाहीररीत्या झालेली ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. नंतरच्या काळात हजारो शेतकरी आत्महत्या झाल्या. सरकार बदलत गेले, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. शेतकऱ्यांचे दु:ख समजून हे आंदोलन लोकचळवळ व्हावी, असे मत आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी महागाव येथे शेतकरी करपे यांना श्रद्धांजली वाहतना व्यक्त केले.
तर, गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून, त्यांच्याप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी दिवसभर उपवास करत, संध्याकाळी लिंबू सरबत पिऊन उपवास सोडल्याचे निमंत्रक अनिल गावंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)