सवलतीच्या दराने शेतक-यांना अन्नधान्याचा पुरवठा!
By Admin | Published: August 10, 2015 01:01 AM2015-08-10T01:01:07+5:302015-08-10T01:01:07+5:30
अंमलबजावणीसाठी तलाठी व स्वस्त धान्य दुकानदार लागले कामाला.
साहेबराव राठोड / मंगरूळपीर (वाशिम) : राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यापृष्ठभूमीवर मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यातील गोरगरीब शेतकर्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे आदेश शासनाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जारी केले होते. या आदेशाची आता अंमलबजावणी सुरू झाली असून, तलाठी व स्वस्त धान्य दुकानदार शेतकरी लाभार्थींचा शोध घेत आहेत. राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, शेतकर्यांचे बजेट कोलमडले आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी कुटुंबाला सार्वजनिक वितरण प्रणालीतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर स्वस्तातील अन्नधान्य देता येईल काय, यावर शासनस्तरावर मंथन होऊन, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात गोरगरीब शेतकर्यांना अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर अन्नधान्य पुरवठा करण्याचे आदेश शासनाने जारी करण्यात आले. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली तसेच विदर्भातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या १४ जिल्हय़ातील शेतकर्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्न धान्याचा पुरवठा केला जाणार आहे. शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून, गावपातळीवर तलाठी व स्वस्त धान्य दुकानदार यांना जनजागृती करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदारांनी बैठक घेतली असून, तलाठी व स्वस्त धान्य दुकानदारांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. एपीएल (केशरी) मधील लाभार्थींच्या यादीतील शेतकर्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ज्या दराने व परिमाणात अन्नधान्याचा लाभ दिला जातो, त्याच परिमाणात व त्याच दराने अन्नधान्याचा लाभ या शेतकर्यांना दिला जाणार आहे. एपीएलमधील शेतकर्यांना तांदुळ प्रति किलो ३ रूपये व गहु २ रूपये प्रतिकिलो या दराने दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना सातबारा, कुटुंब प्रमुखाचे शेतीवर अवलंबून असल्याबाबतचे घोषणापत्र गावातील स्वस्त धान्य दुकानदाराकडे सादर करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने पुरवठा विभागाने वाशिम जिल्ह्यातील सहाही तहसीलदारांना सूचना दिल्या असून अल्पावधीत याची कारवाई पूर्ण केली जावी, असे स्पष्ट केले आहे.