‘समृद्धी’वर खवय्यांची चंगळ, १८ ठिकाणी फूड काेर्ट!

By नारायण जाधव | Updated: January 15, 2025 12:19 IST2025-01-15T12:19:26+5:302025-01-15T12:19:43+5:30

६० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर महामार्गाच्या दोन्ही बाजूला हे फूड कोर्ट राहणार असून, यासाठी एमएसआरडीसीने दोन टप्प्यांत निविदा  मागविल्या होत्या.

Foodies flock to 'Samruddhi', food courts at 18 locations! | ‘समृद्धी’वर खवय्यांची चंगळ, १८ ठिकाणी फूड काेर्ट!

‘समृद्धी’वर खवय्यांची चंगळ, १८ ठिकाणी फूड काेर्ट!

- नारायण जाधव

नवी मुंबई : समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात ‘एमएसआरडीसी’ने जागोजागी १८ फूड कोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या फूड कोर्टच्या निविदांना ११ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता प्रवाशांचे ‘समृद्धी’वरील खायचे वांदे दूर होणार असून, खवय्यांची चंगळ होणार आहे. १८ पैकी तीन फूड कोर्ट ठाणे जिल्ह्यात राहणार आहेत.

६० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर महामार्गाच्या दोन्ही बाजूला हे फूड कोर्ट राहणार असून, यासाठी एमएसआरडीसीने दोन टप्प्यांत निविदा  मागविल्या होत्या. गेल्यावर्षी मागविलेल्या निविदेत ॲप्को इन्फ्राटेकने कंत्राट मिळवले होते; परंतु नंतर संबंधित कंपनी हवा तो निधी उभा करू शकली नसल्याने कंत्राट रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन टप्प्यांत मागविलेल्या या निविदांना पुढील ११ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र, प्रवाशांच्या पोटाेबाची सोय झाली असली  तरी पेट्रोल पंपांचा मुद्दा मात्र अद्याप कागदावरच आहे. यामुळे वाहनांमध्ये टाकी फुल्ल करूनच समृद्धीवरून प्रवास करावा लागणार  आहे.

आमने ते इगतपुरी ४० मिनिटांत
समृद्धी महामार्गाला महामुंबईला जोडणाऱ्या इगतपुरी ते ठाण्यातील आमणे हा ७६ किलोमीटरचा शेवटचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. कसारा घाटामुळे तो रखडला होता. मात्र, कसारा घाटातील बोगद्यांसह इतर सर्व कामे पूर्णत्वाकडे असून, यामुळे आमने ते इगतपुरीदरम्यानचा प्रवास ९० मिनिटांवरून ४० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.

तीन इंटरचेंजमुळे कनेक्टिव्हिटी वाढणार
इगतपुरी ते कसारा सेक्शनमध्ये भारतातील सर्वांत रुंद १७.५ मीटरचा बोगदा आणि इगतपुरीमधील ८ किलोमीटरचा राज्यातील सर्वांत लांब बोगदा समाविष्ट आहे. 
यात ११ किलोमीटर व्यापणारे १५ व्हायाडक्टदेखील आहेत, ज्यामध्ये शहापूरमधील सर्वांत उंच व्हायाडक्ट २८ मजली इमारतीच्या बरोबरीने ८४ मीटर उंच आहे.
इगतपुरी, शहापूर आणि आमने या तीन इंटरचेंजमुळे कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे.

निविदांना प्रतिसाद दिलेल्या कंपन्या
 फेज : १ 
आनंदतारा इन्फ्रास्ट्रक्चर
डीपी असोसिएट्स
मेहरा अँड कंपनी
मिस्टिकल टेक्नोप्लास्ट
प्रकाश बलवंत मेंगणे
शक्ती लाइफस्पेसेस
एसडीएम व्हेंचर्स
 फेज : २ 
आराहा हॉस्पिटॅलिटी
दीप्सिखा फ्रेश फूड
राजेंद्र सुखदेव मिरगणे
सिग्मा लँडकॉन एलएलपी

Web Title: Foodies flock to 'Samruddhi', food courts at 18 locations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.