बुट पॉलिशमधून प्रवाशांची लूट!
By admin | Published: March 1, 2017 01:56 AM2017-03-01T01:56:52+5:302017-03-01T01:56:52+5:30
मध्य रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या बुट पॉलिशमधून प्रवाशांची सर्रासपणे लूट चालवली असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : मध्य रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या बुट पॉलिशमधून प्रवाशांची सर्रासपणे लूट चालवली असल्याचे समोर आले आहे. क्रीम बुट पॉलिशसाठी ७ रुपये आकारणी असतानाही गेल्या दोन वर्षांपासून स्थानकातील बुट पॉलिश कामगारांकडून १० रुपये आकारणी केली जात आहे. १० रुपये आकारणीसाठी मध्य रेल्वेकडून अद्याप कोणतीही मंजुरी मिळालेली नाही. तर प्रवाशांनाही याची कल्पना नसून त्यामुळे ही लूट ‘कोणा’च्या जिवावर सुरू आहे, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना त्यांचे बुट चकाचक करून घेण्यासाठी स्थानकातच बुट पॉलिशची व्यवस्था करून देण्यात आली आहे. अनेक प्रवासी स्थानकातच बुट पॉलिश करून घेताना दिसतात. यासाठी मध्य रेल्वेने सर्व स्थानकांत कंत्राटदारांद्वारे बुट पॉलिश कामगार बसविले असून, पॉलिशसाठी एक विशिष्ट दर ठरविले आहेत. सध्याच्या घडीला संपूर्ण मध्य रेल्वे स्थानकांतील मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर १८८ बुट पॉलिश कामगार आहेत. करारानुसार दरवर्षी प्रत्येक कामगारामागे रेल्वेलाही २४१ रुपये लायसन्स फीदेखील मिळते. मात्र रेल्वेकडून प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या या सुविधेतून प्रवाशांचीच लूट केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्ष २0१0च्या आधी क्रीम पॉलिशसाठी ५ रुपये तर साध्या पॉलिशसाठी ४ रुपये आकारण्यात येत होते. २0१0पासून क्रीम पॉलिशमध्ये २ रुपये तर साध्या पॉलिशमध्येही २ रुपये वाढ करण्यात आली. त्यामुळे क्रीम पॉलिशचे दर हे ७ रुपये आणि साध्या पॉलिशचे दर हे ६ रुपये झाले.
परंतु स्थानकातील बुट पॉलिशसाठी प्रवासी येताच क्रीम पॉलिश करण्याला प्रवासी प्राधान्य देतात. तर बुट पॉलिश कामगारही प्रवाशांना क्रीम पॉलिश करण्यासाठी गळ घालतात. त्यामुळे प्रवासीही क्रीम पॉलिश करतात. मात्र त्यासाठी १० रुपये आकारणी सर्व स्थानकांतच होत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बुट पॉलिशच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. क्रीम पॉलिशचे दर हे ७ रुपयेच आहेत. परंतु बुट पॉलिश कंत्राटदार व कामगारांकडून १० रुपये आकारणीच केली जाते. ही बाब काही रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याही निदर्शनास आली असल्याचे सांगितले. मात्र याविरोधात कारवाई का केली जात नाही? अशी विचारणा करताच त्यावर
अधिकारी निरुत्तर झाले. त्यामुळे प्रवाशांची ही सर्रासपणे लूट रेल्वेच्या डोळ्यांदेखत सुरू असल्याचेच दिसते. (प्रतिनिधी)
>यासंदर्भात आणखी एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, याबाबत खुद्द रेल्वे कर्मचाऱ्यांनाही याचा अनुभव आला आहे. याची माहिती नक्की घेतली जाईल आणि यात दोषी आढळल्यास कारवाईदेखील करण्यात येईल.