पंढरीत भाविकांची मांदियाळी

By admin | Published: July 3, 2017 04:44 AM2017-07-03T04:44:23+5:302017-07-03T04:44:23+5:30

आषाढी एकादशीचा अनुपम सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी सात लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले

In the foothills of the devotees | पंढरीत भाविकांची मांदियाळी

पंढरीत भाविकांची मांदियाळी

Next

प्रभू पुजारी/ लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : आषाढी एकादशीचा अनुपम सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी सात लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत आली असून, दर्शनासाठी तब्बल २२ तासांहून अधिक वेळ लागत आहे.
वारकरी संप्रदायातील कुंभमेळा म्हणून आषाढी यात्रेकडे पाहिले जाते. यात्रेतील प्रमुख दिवस एकादशीचा उत्सव काही तासांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून रेल्वे, एसटी, तसेच खासगी वाहनांमधून सात लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
रविवारी बाजीराव विहीर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे उभे रिंगण, तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गोल रिंगण पार पडले़ संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालख्यांसह अन्य पालख्या वाखरी येथे मुक्कामी विसावल्या़ इकडे भाविकांच्या अलोट गर्दीमुळे पंढरीतील रस्ते, चौक फुलून गेले आहेत. शहरातील सर्व रस्त्यांवर भाविकांचा महापूर ओसंडून वाहू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़ ‘माउली माउली’ म्हणत, भाविक गर्दीतून वाट काढत पुढे-पुढे जात आहेत.
श्री विठ्ठल-रुक्मिणी पददर्शन रांग संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपापासून ते गोपाळपूरच्या पुढे गेली आहे़ त्यामुळे पदस्पर्श दर्शनासाठी तब्बल २२ तासांहून जास्त कालावधी लागतोय, असे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन पश्चिमद्वारातून बाहेर आलेले प्रकाश गाबणे (हिंगोली) या भाविकाने सांगितले़

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १० मंत्री पंढरीत येत आहेत़ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे़ फडणवीस हे तिसऱ्यांदा महापूजेसाठी येत आहेत.

दर्शनरांगेत मोफत चहा-पाणी

पंढरीत दाखल झालेला वारकरी चंद्रभागेत पवित्र स्नान करून दर्शन रांगेत सहभागी होत आहे.दर्शन रांगेतील भाविकांना शुद्ध पाणी व चहाची मोफत व्यवस्था आहे, तसेच प्रथमोपचार केंद्रही २४ तास खुले असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: In the foothills of the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.