प्रयत्न सोडणार नाही, खा. इम्तियाज जलील यांचा एल्गार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 03:29 PM2022-03-20T15:29:34+5:302022-03-20T15:29:55+5:30
भाजपा या देशासाठी सर्वात घातक पक्ष आहे. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी भाजपा समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम करते असा आरोप MIM खासदार इम्तियाज जलील यांनी लावला आहे.
औरंगाबाद – राज्यात MIM महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार आहे असं सांगत खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील राजकीय वातावरणात नवा वाद निर्माण केला आहे. MIM सोबत शिवसेना जाणार का? हे पाहणं गरजेचे आहे. मात्र शिवसेनेने हिंदुह्रदयसम्राटऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेले आहे असा टोला भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. मात्र भाजपाचं हिंदुत्व केवळ राजकारणासाठीच असतं असा प्रतिटोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) MIM चा कट उधळवून लावा. ती भाजपाची बी टीम आहे असं सांगत त्यांच्यासोबत युती करण्यास नकार दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की, भाजपाला दूर ठेवण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्ही कुणाच्याही बोलण्यावरून मैत्रीचा हात पुढे करत नाही. या देशाला वाचवण्यासाठी आम्हाला हे करावं लागतंय. शिवसेना कधीही हिंदुत्व सोडणार नाही. तुम्ही हिंदुत्वाचा गाजावाजा आणखी किती वेळ करणार? तुम्ही केवळ हिंदुंचे नाही तर दलित, मुस्लीम, शीख सर्वधर्मीयांचे मुख्यमंत्री आहात असं जलील यांनी सांगितले.
तसेच खासदार असून मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही हे कुणी सांगेल का? हिंदुत्ववादी गाजावाजा किती वेळ करणार? तुम्हाला राज्याची चिंता नाही का? तुम्ही सगळ्यांचे मुख्यमंत्री आहे. आम्ही मिशन घेऊन आता बाहेर पडलोय. आम्ही महाविकास आघाडीत जाण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. भाजपा या देशासाठी सर्वात घातक पक्ष आहे. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी भाजपा समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम करते. एका सिनेमाचं प्रमोशन भाजपा करतेय. त्यामुळे आघाडीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. लवकरच शरद पवार(Sharad Pawar), उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. भेटून यावर चर्चा करू असं जलील यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, औरंगजेब हा इतिहास झाला. सगळे मुस्लीम त्यांच्या कबरीकडे जाऊन गुडघे टेकतात असं काही नाही. असेल तर तुम्ही दाखवा. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करू नका. तुमच्यापेक्षा जास्त आदर आम्ही करतो परंतु स्वार्थासाठी त्यांच्या नावाचा वापर करत नाही असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना(Shivsena Sanjay Raut) लगावला आहे.