...तरीही जयंत पाटलांना विजयाचा विश्वास; पक्षासाठी विधानपरिषदेत जाणे महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 09:47 AM2024-07-04T09:47:04+5:302024-07-04T09:47:41+5:30
अलिबागचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे
अलिबाग - शेतकरी भवनातून राज्याचा मुख्यमंत्री निवडण्याची भाषा करणाऱ्या शेकापचे जयंत पाटील यांना या राजकीय परिस्थितीमुळे विधानपरिषद निवडणूक ही आव्हानात्मक ठरणार अशी चर्चा आहे. उद्धव सेनेच्या मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी अडचणीची ठरणार आहे. मात्र जयंत पाटील यांना आपल्या विजयाची खात्री आहे. विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी महाविकास आघाडीकडून तीन तर महायुतीकडून नऊ आणि अपक्ष दोन असे १४ उमेदवार रिंगणात आहेत.
अलिबागचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे. मात्र ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. महाविकास आघाडीकडे दोन आमदार निवडून येण्याची ताकद आहे. मात्र तिसऱ्या उमेदवारासाठी कसरत करावी लागणार आहे.
शेकापची ताकद कमी
जयंत पाटील यांनी माझी ही शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले आहे. सध्या रायगडात शेकापची ताकद कमी झाली आहे. विधानसभेत त्यांचा एकच आमदार आहे. पक्षाची झालेली ही पिछेहाट रोखण्यासाठी जयंत पाटील यांना विधानपरिषदेत आमदार होणे पक्षाच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने अति महत्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची निवडून आणण्याची जबाबदारी जयंत पाटील यांनी घेतली होती. मात्र त्यांचा करिश्मा चालला नाही. त्यामुळे ठाकरे सेनेत नाराजीचा सूर आहे.
विधानपरिषद निवडणूक ही महाविकास आघाडीतून लढवत आहे. महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिले आहेत. तीनही उमेदवार विजयी होणार आहेत. आमच्याकडे ७१ मते असून ६९ मतांची गरज आहे. त्यामुळे आम्ही आमचा कोटा पूर्ण करून तिघांना विजयी करणार.- जयंत पाटील, आमदार, शेकाप