राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच, भाजपा-शिंदे गटातील ही नावं आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 11:58 AM2022-08-23T11:58:58+5:302022-08-23T11:59:45+5:30
Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त आमदारांच्या १२ जागांसाठी भाजपा आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या १२ जागांपैकी ८ जागा भाजपाला तर ४ जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई - गेल्या तीन महिन्यांतील नाट्यमय घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली यादी रद्द करून ती नव्याने पाठवण्याची घोषणा केली होती. आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या १२ जागांसाठी भाजपा आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या १२ जागांपैकी ८ जागा भाजपाला तर ४ जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे.
राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामध्ये भाजपाच्या वाट्याला ८ जागा येण्याची शक्यता आहे. या आठ जागांसाठी भाजपाकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, चित्रा वाघ, कृपाशंकर सिंह, गणेश हाके, सुधाकर भालेराव यांच्या नावांची चर्चा आहे.
शिंदे गटाच्या वाट्याला १२ जागांपैकी ४ जागा येण्याची शक्यता आहे. या चार जागांसाठी शिंदेगटातील माजी मंत्री रामदास कदम, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, नरेश म्हस्के, चंद्रकांत रघुवंशी, आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ यांची नावं आघाडीवर आहेत.
आधीच्या महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेरपर्यंत मंजूर केली नव्हती. त्यातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या १२ जागांसाठी नव्याने यादी पाठवण्याचे निश्चित केले होते.