राज्याच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकारी मुख्य सचिव; सुजाता साैनिक यांनी स्वीकारला पदभार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 05:33 AM2024-07-01T05:33:23+5:302024-07-01T05:33:56+5:30
प्रशासन आणि पोलिस प्रशासन या दोन्हींचे नेतृत्व महिलांकडे असल्याचा योग पहिल्यांदाच जुळून आला आहे.
मुंबई - राज्याच्या मुख्य सचिवपदी १९८७च्या तुकडीतील ज्येष्ठ आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली. हे पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. पती व पत्नी दोघेही राज्याच्या मुख्य सचिवपदावर पोहोचले अशी महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे.
मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी राज्य सरकारने सुजाता सौनिक यांची नियुक्ती केली. त्यांनी रविवारी सायंकाळी करीर यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्या जून २०२५ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांचे पती मनोज सौनिक हे करीर यांच्याआधी राज्याचे मुख्य सचिव होते.
प्रशासन अन् पोलिस प्रशासन महिलांकडेच
प्रशासनाची धुरा आता सुजाता सौनिक यांच्याकडे तर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांच्याकडे आहे. प्रशासन आणि पोलिस प्रशासन या दोन्हींचे नेतृत्व महिलांकडे असल्याचा योग पहिल्यांदाच जुळून आला आहे.