शासनाचा ‘मनसे’ दणका , बँक, रेल्वेला मराठीची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:46 AM2017-12-06T04:46:43+5:302017-12-06T06:29:38+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यानी गेल्या महिन्यात ठाण्यात झालेल्या जाहिर सभेत परप्रांतिय फेरीवाल्यांवर तोंडसुख घेतांनाच राज्यातील राष्ट्रीय आणि आंतरराज्य बँकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर केला नाही
नारायण जाधव
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यानी गेल्या महिन्यात ठाण्यात झालेल्या जाहिर सभेत परप्रांतिय फेरीवाल्यांवर तोंडसुख घेतांनाच राज्यातील राष्ट्रीय आणि आंतरराज्य बँकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर केला नाही तर मनसे स्टाईने खळखट्याकचा इशारा दिला होता. त्याची अद्याप बँकांनी दखलघेतली नसली तरी महाराष्ट्र शासनाने मात्र केवळ बँकाच नव्हे तर टपाल कार्यालये, विमान कंपन्या, विमा कंपन्या, गॅस व पेट्रोलिय कंपन्या, करविभाग, दूरध्वनी कंपन्यासह रेल्वे, मोनो-मेट्रो रेल्वे कंपन्यांनाही त्यांच्या दैंनदिन व्यवहारासह पत्रव्यहार आणि जनसंपर्क, जाहिराती, तिकिटांवर हिंदी इंग्रजीबरोबरचमराठी भाषा वापराची सक्ती केली आहे. यासाठी शासनाच्या मराठी भाषा विभागाने केंद्र सरकारचे त्रिभाषा सूत्र आणि महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४, सुधारणा २०१५ची आठवण मंगळवारी काढलेल्या आदेशात करून दिली आहे.
मुंबईतील एल्फिन्सटन रोड रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परप्रांतिय फेरीवाल्यांविरोधात आंदोलन सुरू करून फेरीवाल्यांना चोप दिला होता. त्यानंतर मुंबई काँगे्रसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने मोर्चा काढून त्यांचे समर्थन केले होते. मुंबई उच्च न्यायलायानेही रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर परिघात फेरीवाल्यांना मनाई केल्याने मनसेच्या शिडात हवा भरली गेली. त्यानंतर ठाण्यात मनसेचे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून चोप दिला. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेऊन आंदोलनाचे समर्थन करून यापुढे मराठीचा वापर न करणाºया बँकाविरोधात खळखट्याकचा इशारा दिला होता. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले. त्यानंतरही काही बँकांनी त्याला न जुमानल्याने ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आता महाराष्ट्र शासनाने मंगळवारी तातडीने मराठीचा वापर करण्याची सक्ती करण्याचे हे आदेश काढले आहेत.
काय आहे आदेशात
जनतेशी करण्यात येणारा पत्रव्यवहार, मौखिक व दुरध्वनी वा अन्य माध्यमांद्वारेच्या संदेश वहनात मराठीचा वापर करावा
नावाच्या पाट्या, वृत्तपत्रीय जाहिराती,
निर्देश फलकांवर मराठीचा वापर करावा
बँकाचे सर्व दस्तऐवज, रेल्वे, विमान, मोनो-मेट्रोचे आरक्षणाचे अर्ज, तिकिटे, बँकांच्या स्लीप, निवेदनात देवनागरीचा वापर करावा
आॅनलाईन-आॅफलाईन व्यवहारातही मराठीचा वापर करावा