कंत्राटी कामगारांना लुटणाऱ्यांवर फौजदारी
By Admin | Published: July 13, 2017 01:37 AM2017-07-13T01:37:08+5:302017-07-13T01:37:08+5:30
कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम लाटणाऱ्या संस्थांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अखेर कारवाईचा बडगा उगारला
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम लाटणाऱ्या संस्थांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. नोटीस बजावूनही, दाद न देणाऱ्या एका संस्थेविरोधात महापालिकेने भोसरी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे.
स्वच्छतेचे काम करणाऱ्या संस्था कामगारांचा पीएफ भरत नसल्याचा मुद्दा स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी बैठकीत उपस्थित केला होता. कामगारांचे पैसे न भरणाऱ्यांवर फौजदारी दाखल केली जाईल, असे बैठकीत सांगितले होते. त्यानुसार प्रशासनाने माहिती मागविल्यानंतर सुरुवातीला काही संस्था ही रक्कम भरत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार नोटिसाही दिल्या होत्या. बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत कंत्राटी कामगारांचा पीएफ न भरणाऱ्या संस्थांवर काय कारवाई केली? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.
महापालिकेने केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार १२ कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम ठेकेदार संस्थेला दिली. महापालिकेने दिलेली रक्कम आणि कामगारांची नियमानुसार ठेकेदाराने भरावयाची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे संस्थेने जमा करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, संस्थेने ही रक्कम जमा न करता बँकेचे खोटे शिक्के मारून पीएफची रक्कम भरल्याचे भासविले.
क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी देव स्वयंरोजगार संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सदस्यांना दिली. महापालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यलायच्या हद्दीतील रस्ते आणि गटर साफसफाईचे काम खासगी ठेकेदारांकडून करून घेण्यासाठी २०१५ मध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये पात्र ठरलेल्या देव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला हे काम मिळाले. या संस्थेने या कामासाठी १२ कंत्राटी कामगार पुरवावेत, असे आदेश महापालिकेने दिले.