विदेशी कंपन्यांची बुलेट ट्रेनसाठी रस्सीखेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 05:18 AM2018-03-28T05:18:51+5:302018-03-28T05:18:51+5:30
देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे स्वप्न जपानच्या मदतीने प्रत्यक्षात आकारास येत आहे
महेश चेमटे
मुंबई : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे स्वप्न जपानच्या मदतीने प्रत्यक्षात आकारास येत आहे. त्याचबरोबर, देशातील विविध शहरांतर्गत बुलेट ट्रेन यशस्वी होऊ शकेल का? याची चाचपणी करण्यासाठी विदेशी कंपन्या सरसावल्या आहेत. यात जर्मनी, फ्रान्स, आॅस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे. विदेशी कंपन्यांची देशातील बुलेट प्रकल्प मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, मुंबई-पुणे-नागपूर मार्गावर बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षणाला बोर्डातर्फे हिरवा कंदील देण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, विकसनशील देशात बुलेट प्रकल्प सुरू करून, वर्षानुवर्षे नफा मिळविण्याच्या उद्देशाने जगभरातील बुलेट ट्रेन कंपन्या सज्ज आहे. यात जर्मनी, फ्रान्स आणि आॅस्ट्रेलिया येथील बुलेट ट्रेन कंपन्या आघाडीवर आहे. सध्या केवळ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नव्या बुलेट ट्रेन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली नाही. तथापि, मुंबई-नागपूर, दिल्ली-वाराणसी, पुणे-नागपूर या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विदेशी कंपन्यांनी ‘आवश्यकता’ सर्वेक्षणाला बोर्डातर्फे मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या सर्व्हेला सुरुवात होणार आहे. सर्व्हेच्या अहवालानंतर या
बुलेट ट्रेन प्रकल्पांवर योग्य निर्णय घेण्यात येईल.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ठाणे आणि साबरमती येथे प्रत्येकी एक कायमस्वरूपी डेपो उभारण्यात येणार आहे, तर बुलेट ट्रेनच्या चाचणीसाठी सुरत येथे तात्पुरत्या स्वरूपाचा डेपो उभारण्यात येणार आहे. हजार किलोमीटर चाचणी घेतल्यानंतर प्रत्यक्ष प्रवाशांसह बुलेट ट्रेन धावणार आहे. देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अर्थात, १५ आॅगस्ट २०२२ ही डेडलाइन बुलेट ट्रेनसाठी निश्चित करण्यात आली आहे.
जलद प्रवासासाठी नागरिक हवाई प्रवासाला प्राधान्य देतात. देशातील लोकसंख्येच्या तुलनेत ५ टक्क्यांहून कमी प्रवासी वाहतुकीसाठी हवाई मार्गाचा वापर करतात. सद्य:स्थितीत हवाई मार्गामुळे दोन ठिकाणांमधील अंतर काही तासांचे असते. मात्र, हे अंतर केवळ विमान उड्डाणाचे असते.
विमानतळावरील चेक इन, बोर्डिंग, घरापासून विमानतळाला जाण्याचा वेळ या सर्वांचे एकूण वेळ आणि विमान उड्डाणाचा वेळ यांना एकत्रित केल्यास, सुमारे चार ते पाच तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. यामुळे बुलेट ट्रेन सुरू झाल्यास, प्रवाशांचा प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ वाचणार असल्याचे रेल्वे बोर्डातील अधिकारी सांगतात.