मुंबईच्या वाहतुकीसाठी परदेशी फंड
By admin | Published: February 14, 2015 04:40 AM2015-02-14T04:40:29+5:302015-02-14T04:40:29+5:30
मुंबईच्या वाहतुकीचा तिढा सोडविण्यासाठी जागतिक पातळीवरील ख्यातकीर्त दानशूर उद्योगपती मायकेल ब्लुमबर्ग यांनी मदतीचा हात पुढे केला
मुंबई : मुंबईच्या वाहतुकीचा तिढा सोडविण्यासाठी जागतिक पातळीवरील ख्यातकीर्त दानशूर उद्योगपती मायकेल ब्लुमबर्ग यांनी मदतीचा हात पुढे केला असून, १०० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीबरोबरच ते जगविख्यात तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देणार आहेत.
जगातील १० शहरांतील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी सहकार्य करण्याचे ब्लुमबर्ग यांनी ठरविले असून, त्यात भारतातून केवळ मुंबईची निवड त्यांनी केली आहे.
मुंबई आणि शांघायसह १० शहरांसाठी ब्लुमबर्ग हे येत्या पाच वर्षांत सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करणार असून, त्यातील १०० कोटी रुपये मुंबईसाठी असतील. ब्लुमबर्ग हे १७ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. रस्ते सुरक्षा, वाहतुकीचे नियम, वाहतुकाची कोंडी फोडण्यासाठीच्या उपाययोजना यावर जगातील नामवंत वाहतूक तज्ज्ञांचे मार्गदर्शन या माध्यमातून मिळेल. त्यासाठीची साधनेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ब्लुमबर्ग फाउंडेशन आणि राज्य शासन व मुंबई महापालिकेच्या समन्वय समितीच्या माध्यमातून हे काम केले जाईल.
मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी
आणि फाउंडेशनच्या शिष्टमंडळाची आज याबाबत बैठक झाली. वाहतूक सुधारणेचा प्रारंभ १७ तारखेला मुंबईपासून होणार
आहे. (विशेष प्रतिनिधी)