एप्रिलपासून कोल्हापुरात ‘फॉरेन्सिक लॅब’ सुरू
By admin | Published: March 6, 2016 03:45 AM2016-03-06T03:45:03+5:302016-03-06T03:45:03+5:30
व्हिसेराच्या चाचणीचा अहवाल तत्काळ मिळण्यासाठी नांदेडपाठोपाठ आता कोल्हापुरातही १ एप्रिलपासून ‘फॉरेन्सिक लॅब’ (प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा) सुरू होत आहे.
कोल्हापूर : व्हिसेराच्या चाचणीचा अहवाल तत्काळ मिळण्यासाठी नांदेडपाठोपाठ आता कोल्हापुरातही
१ एप्रिलपासून ‘फॉरेन्सिक लॅब’ (प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा) सुरू होत आहे. कोल्हापूर येथील कावळा नाका येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (बांधकाम) विभागाची इमारत काही वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. या लॅबमध्ये कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील ‘व्हिसेरा’ची चाचणी होणार आहे, अशी माहिती राज्याच्या विधी आणि तांत्रिक विभागाच्या पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मृताच्या शवविच्छेदनावेळी शरीरातील काढलेले भाग पुणे येथील औंध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. त्यांचे रिपोर्ट वेळेवर मिळत नसल्याने तपासकामास विलंब लागतो, अशा तक्रारी कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून गृहविभागाकडे केल्या होत्या. त्यांची दखल घेत गृह विभागाने नांदेडपाठोपाठ कोल्हापूरच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. नांदेडमध्ये १० फेब्रुवारी रोजी फॉरेन्सिक लॅब सुरू करण्यात आली. १ एप्रिलपासून कोल्हापुरात लॅब सुरू करण्याचे शासनाचे निर्देश होते. बोरवणकर यांनी कावळा नाका येथील इमारतीची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चाही केली.
‘फॉरेन्सिक लॅब’करिता कायमस्वरूपी इमारत बांधण्यासाठी कसबा बावडा येथील गोळीबार मैदान निश्चित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)