वनविभागातही ‘गुप्तहेर खाते’
By admin | Published: February 9, 2017 05:20 AM2017-02-09T05:20:14+5:302017-02-09T05:20:14+5:30
वन्यजीव, चंदन, सागवान वृक्षांची तस्करी, वाघांच्या शिकारींचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आदींवर अंकुश ठेवण्यासाठी, राज्य वनविभागातही गुप्तहेर खाते स्थापन केले जाणार आहे.
गणेश वासनिक , अमरावती
वन्यजीव, चंदन, सागवान वृक्षांची तस्करी, वाघांच्या शिकारींचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आदींवर अंकुश ठेवण्यासाठी, राज्य वनविभागातही गुप्तहेर खाते स्थापन केले जाणार आहे. त्यासाठी सध्या पुणे येथील ‘इंटेलिजन्स’ अकादमीत निवडक वनाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने व्याघ्र शिकारीसंदर्भात दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाने वन्यजीव, वनांच्या संरक्षणासाठी कृती आराखडा तयार केला आहे. या अहवालाच्या आधारे वनविभागात स्वतंत्र गुप्तहेर खाते स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या गुप्तहेर खात्यात तज्ज्ञ, प्रशिक्षित वनाधिकारी असावेत, यासाठी पहिल्या टप्प्यात पुण्यात प्रशिक्षणाला प्रारंभ झाला आहे. पोलीस, लष्कराच्या धर्तीवर वनाधिकाऱ्यांना वन्यजीव गुन्ह्यांचा तपास, आरोपींचा मागोवा, तपासकार्यात श्वानाची मदत, सीमेपार तस्करांचे जाळे शोधणे, आरोपींना जेरबंद करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र, खबऱ्यांचे जाळे निर्माण करणे आदी गोष्टींचे प्रशिक्षण दिले जात आहे. वाघांसह वनविभागाची संपदा सुरक्षित ठेवण्यासाठी राज्याचे ११ वनविभाग, सहा व्याघ्र प्रकल्पात या खात्याची स्थापना केली जाणार आहे. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशातही अशा प्रकारचे गुप्तहेर खाते स्थापन केले जाणार आहे.
६० वनाधिकाऱ्यांची निवड
या प्रशिक्षणासाठी पहिल्या टप्प्यात ६० वनाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल दर्जाचे अधिकारी प्रशिक्षणासाठी पुण्याला रवाना झाले आहेत. इंटेलिजन्स अकादमीत तज्ज्ञांकडून प्रगत, अद्ययावत प्रशिक्षण घेऊन ही चमू वन्यजीव, वनांच्या संरक्षणासाठी ब्युरोमार्फत काम करणार आहे.