वनविभागाचे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
By admin | Published: February 2, 2016 04:02 AM2016-02-02T04:02:28+5:302016-02-02T04:02:28+5:30
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा अभयारण्यात इसिसच्या कथित अतिरेक्यांनी रेकी केल्याचे उघड झाल्याने स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.
जितेंद्र कालेकर, ठाणे
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा अभयारण्यात इसिसच्या कथित अतिरेक्यांनी रेकी केल्याचे उघड झाल्याने स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. वन विभागाची परवानगी न घेता अभयारण्याच्या परिसरात त्यांनी घुसखोरी कशी केली, असा सवाल या परिसराला भेट देणाऱ्या एटीएसच्या पथकाने केला आहे.
‘इसिस’मध्ये सामील होणाऱ्यांना बॉम्ब बनविण्याचे आणि ते हाताळण्याचे प्रशिक्षण कर्नाळा अभयारण्यात दिले जाणार होते. उत्तर प्रदेशात पकडलेला रिझवान अहमद याने या भागाची रेकी केली होती. मुंब्रा येथून अटक केलेला मुदब्बीर सध्या एनआयएच्या ताब्यात असून, त्याने व त्याच्या साथीदारांनी चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, कर्नाळ्यातील त्याच परिसराला एटीएसच्या पथकाने सोमवारी भेट देऊन तेथील पाहणी केली. आता या ठिकाणच्या सुरक्षेतही अधिक वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, वन विभागाने गाफील राहून बाहेरील व्यक्तींना अभयारण्याच्या परिसरात प्रवेश कसा दिला, याचा जाब त्यांना द्यावा लागणार आहे. मुदब्बीर व फरहान या दोघांच्या नातलगांची चौकशी करण्यामागे कुणालाही विनाकारण त्रास देणे, हा हेतू नाही. निर्दोष व्यक्तीवर कारवाई होणार नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. फरहान शेखची आजी मेहरुन्निसा यांच्याकडे झालेल्या चौकशीत आणि घरझडतीत अधिकाऱ्यांना विशेष काही हाती लागले नाही. फरहानच्या कृत्याबद्दल मेहरुन्निसा यांनी पश्चात्ताप झाल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.