वन विभागाच्या शूटरने केले ७० रानडुक्कर ठार
By Admin | Published: January 11, 2016 02:42 AM2016-01-11T02:42:31+5:302016-01-11T02:42:31+5:30
मध्य चांदा वनविभागांतर्गत कोठारी-धाबा वनक्षेत्रातील शेतशिवारात धुमाकूळ घालणाऱ्या ७० रानडुकरांना वन विभागाच्या शूटरने ठार केले
सुरेश रंगारी , कोठारी (चंद्रपूर) मध्य चांदा वनविभागांतर्गत कोठारी-धाबा वनक्षेत्रातील शेतशिवारात धुमाकूळ घालणाऱ्या ७० रानडुकरांना वन विभागाच्या शूटरने ठार केले. गेल्या चार दिवसांत अत्यंत गुप्तपणे ही कारवाई केली. वन विभागाच्या या कारवाईबद्दल वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
जंगलाजवळच्या गावांमध्ये रानडुकरांकडून शेतपिकाची प्रचंड नुकसान केले जाते. याची चौकशी करून नुकसान भरपाई देण्याचे वनविभागाने मान्य केले होते. तसेच घुमाकूळ घालणाऱ्या रोही व रानडुकरांना शासनाच्या नियमाने मारण्याची परवानगीही वनविभागाने दिली होती. मात्र त्यांना मारण्याची प्रक्रिया किचकट असल्याने शेतकऱ्यांना ते शक्य नव्हते. त्यामुळे वन विभागानेच या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. वन्यप्रेमीत संताप : शेतकऱ्यांना होणारा रानडुकरांचा त्रास थांबविण्यासाठी शासनाने शेतशिवार संरक्षण कुंपण योजना सुरू केली. मात्र ही उपाययोजना फसली. निरपराध रानडुकरांची हत्या करण्याचा अधिकार वन विभागाला नाही. हा प्रकार संताप आणणारा असून त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी वन्यप्रेमी धीरज बांबोडे यांनी केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे व त्यांच्या मार्गदर्शनात कोठारी व धाबा क्षेत्रात ७० रानडुकरांना शूट करण्यात आले असून यापुढेही ही कारवाई सुरू राहील. - जी.बी. हाके, वन अधिकारी, कोठारी वनपरिक्षेत्र