कुणी कितीही आरोप केले तरी वनविभागाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरुच राहणार :सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:39 PM2019-06-03T16:39:45+5:302019-06-03T16:48:20+5:30
वृक्ष तोडणाऱ्यांसाठी कायदा आहे. पण शिक्षेची तरतुद कमी आहे, त्यामुळे गांभीर्य नाही.
पुणे : माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी चंद्रपूरमध्ये वृक्षारोपणाची गरज नाही, वनविभागाचे नियोजन चुकले आहे असा आरोप केला आहे. मात्र, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. धन आणि वन याला कसलीही मर्यादा नाही. त्या काही म्हणत असल्या तरी वन विभागाचा कार्यक्रम सुरूच राहील असे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
पुण्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, देशी झाडांच्या लागवडीलाच महत्व दिले जात आहे. १५६ प्रजातींचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यात भूजल वाढवणारे, पक्षी वाढवणारे, पाऊस वाढवणारी अशा झाडांची नावे त्यात आहेत. २८ हजार ग्रामपंचायतींना पुस्तके वाटली, नर्सरींना दिले. तशी रोपे तयार होतात व तीच लावली जातात.
वृक्ष तोडणाऱ्यांसाठी कायदा आहे. पण शिक्षेची तरतुद कमी आहे, त्यामुळे गांभीर्य नाही. म्हणून कायद्यात दुरुस्ती करत आहोत. एक समिती त्यासाठी स्थापन केली आहे. अभ्यास सुरू आहे.
................
खोत म्हणाले, मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत ७ जूनला खरीप आढावा बैठक होत आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा लक्षांक पुर्ण न करणाऱ्या बँकांची माहिती घेण्यात येईल. त्या बँकांवर कारवाई करण्याबाबत केंद्राला कळवण्यात येणार आहे.राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात गंगाधाम येथे ६ जूनला होत आहे. त्यात आम्ही ल़ोकसभेचा राजकीय आढावा घेऊ. विधानसभेला किती जागा मागायच्या ते त्यात ठरवू.बियाणांचा साठा पुरेसा आहे. खतेही आहेत. जिल्हानिहाय पथके स्थापन करणार, महसूलचीही मदत घेऊ. काळाबाजार करणाऱ्या गय करणार नाही. शेतकऱ्यांना पुर्ण मदत केली जाईल, असेही खोत म्हणाले.
........
राजू शेट्टींबाबत भाजपाच निर्णय घेईल. मी मध्यस्थी करण्याइतका मोठा नाही. मी काय त्यांना मार्गदर्शन करणार, मीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो आहे. त्यांनी भाजपाबरोबर यावे मी कसे सांगणार.आमच्या रयत क्रांतीचे विधानसभेसाठीचे ऊमेदवार कमळ चिन्हावरच लढणार. रयत क्रांती हा काही पक्ष नाही.- सदाभाऊ खोत