वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माजी पीएला मारहाण, व्हिडिओ व्हायरल, मारणारी व्यक्ती म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 01:08 AM2023-01-12T01:08:34+5:302023-01-12T01:09:30+5:30
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवित सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोपावरून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी स्विय सहाय्यक अजय धवणे यांना एक व्यक्तीने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
चंद्रपूर - नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवित सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोपावरून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी स्विय सहाय्यक अजय धवणे यांना एक व्यक्तीने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती अजय धवने यांना लाथाबुक्यांनी मारहाण करताना दिसत आहे. मात्र संबंधित मारहाण करणारी व्यक्ती आता समोर आली असून, त्यांनी हा व्हिडीओ सव्वा वर्षापूर्वीचा असल्याचे सांगितले आहे. तसेच हा जुना व्हिडीओ राजकीय हेतूने व्हायरल केल्याचा दावा केला आहे.
अजय धवने यांनी मारहाण करत असलेल्या पीडिताकडून नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 13 लाख रुपये घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अजय धवने यांनी नोकरी लावण्याच्या नावावर एक लाखापासून तीस लाखापर्यंत पैसे उकळल्याची चर्चा सुरू आहेत. दरम्यान, धवने यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये त्या व्यक्तीने स्पष्टीकरण दिले आहे. या व्यक्तीचं नाव रामजी हरणे असं आहे. त्यांनी सांगितलं की, मी एक महत्त्वाचं आवाहन करण्यासाठी समोर आलो आहे. गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये मी अजय धवने नावाच्या व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ ऑक्टोबर २०२१ मधील आहे. अजय घवने या व्यक्तीला मी काही कारणास्तव पैसे दिले होते. ते पैसे परत करण्यास त्यांनी विलंब केला. त्यामुळे माझ्या हातून ती घटना घडली होती. हे मी मान्य करतो. त्याबाबत मी त्यांची माफी मागितली होती. तसेत पेैसे परत केले होते. मात्र आता काही राजनीतिक छडयंत्रकारी हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. त्यांचा हेतू काय आहे हे त्यांनाच माहिती, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान , अजय धवने यांचा राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाशी काहीही संबंध नसून धवने याला दिनांक ३१-०१-२०२२ रोजी श्री मुनगंटीवार यांनी निष्कासीत केले आहे. त्यामुळे सदर व्यवहाराशी संबंध जोडणे अप्रस्तुत आहे अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.