शिवनेरी किल्ल्यावर वनाधिकाऱ्यांची मद्यपार्टी; दोन जण निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 08:45 AM2018-02-19T08:45:15+5:302018-02-19T08:51:54+5:30
किल्ल्यावर काही अनुचित प्रकार किंवा मद्यपानाच्या घटना घडू नयेत, यासाठी वनकर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या देखभालीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या वनाधिकाऱ्यांकडूनच किल्ल्यावर मद्यपार्टी करण्यात आल्याचा संतापनजक प्रकार उघडकीला आला आहे. सोमवारी साजऱ्या होत असलेल्या शिवजयंती उत्सवासाठी काल रात्री काही शिवप्रेमी गडावर आले असताना त्यांच्या दृष्टीस हा प्रकार पडला. त्यानंतर या तरुणांनी मद्यधुंद अवस्थेतील या कर्मचाऱ्यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले. तसेच त्यांना पकडून जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले. या व्हिडिओच्याआधारे पोलिसांनी मद्यपान केलेल्या वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. यापैकी प्रकाश जाधव आणि संतोष नवगिर्हे या दोन वनाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
किल्ल्यावर काही अनुचित प्रकार किंवा मद्यपानाच्या घटना घडू नयेत, यासाठी वनकर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, या कर्मचाऱ्यांकडूनच सगळ्याला हरताळ फासण्यात आल्याने आता किल्ल्याच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हा प्रकार उघडकीला आल्यानंतर सुरुवातीला पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यात टाळाटाळ करण्यात येत होती. मात्र, शिवप्रेमींनी या प्रकाराची ध्वनीचित्रफीत दाखवल्यानंतर पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला. मात्र, या प्रकारामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.