वन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट !
By admin | Published: September 5, 2014 01:06 AM2014-09-05T01:06:04+5:302014-09-05T01:06:04+5:30
राज्यभरातील हजारो वन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गत ११ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेच्या नेतृत्वात सुरू
एका संघटनेची माघार : दुसऱ्या संघटनेचा संघर्ष कायम
नागपूर : राज्यभरातील हजारो वन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गत ११ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या संयुक्त आंदोलनात गुरुवारी अचानक फूट पडली आहे.
यात एकिकडे महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेचे अध्यक्ष विजय मेहर यांनी एका शिष्टमंडळासह सायं. ५ वाजताच्या सुमारास राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) अशोककुमार सक्सेना यांच्याशी चर्चा करून, संप स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. परंतु त्याचवेळी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकून, आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. तसेच उद्या (शुक्रवारी) वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्याशी दुपारी १२ वाजता प्रत्यक्ष भेट घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, या दोन्ही संघटनांनी गत २५ आॅगस्टपासून हा राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला होता. यात राज्यभरातील हजारो वन कर्मचारी सहभागी झाले होते. या दोन्ही संघटना वेगवेगळ्या असल्या, तरी त्यांच्या मागण्या मात्र सारख्याच होत्या. त्यामुळे गत ११ दिवसांपासून दोन्ही संघटनांमधील सर्व वन कर्मचारी खांद्याला खांदा लावून, आपल्या हक्कासाठी संघर्ष करीत होते. परंतु गुरुवारी अचानक या दोन्ही संघटनांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी गत ३० आॅगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत वन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच त्यांनी वनरक्षक व वनपाल कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर गत नुकत्याच २ सप्टेंबर रोजी वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी पुन्हा वन कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, वेतनश्रेणी सुधारणेच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.
प्रतिकात्मक प्रेतयात्रा
गत ११ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारी शेकडो वन कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात शासनाच्या प्रतिकात्मक शव तयार करून, श्रद्धांजली वाहण्यात आली. यात महिला वन कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. दुपारी १२ वाजतापासून सुरू झालेले हे अफलातून आंदोलन सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. मात्र काहीच वेळात या आंदोलनाची माहिती बर्डी पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यामुळे दुपारी ३ वाजताच्या सुमारास बर्डी पोलिसांनी ते प्रतिकात्मक शव तोडून आकटे ताब्यात घेतले. यानंतर काहीच वेळात पोलीस निरीक्षक येरणेकर सुद्धा आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी वनकर्मचाऱ्यांना लगेच आंदोलनस्थळापासून दूर जाण्याचे निर्देश देऊन, अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. यामुळे घाबरलेल्या आंदोलकांची दाणादाण होऊन, सर्वांनी संविधान चौकातून काढता पाय घेतला.