वनपाल पदाची सेवाज्येष्ठता नियमानुसारच व्हावी; मॅटचा निर्वाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:34 AM2021-11-22T11:34:32+5:302021-11-22T11:35:36+5:30
याप्रकरणी जालना येथील वृषाली बाळकृष्ण तांबे यांनी मॅटमध्ये अर्ज केला होता. वनपाल पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ मध्ये परीक्षा घेतली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. २९ जणांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी गेली.
मुंबई : वनपाल पदाची सेवाज्येष्ठता ही उमेदवाराला महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत मिळालेले गुण व त्याला प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या गुणांवरून ठरवली जावी, असा निर्वाळा महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने (मॅट) दिला आहे. उमेदवार प्रशिक्षणाला गेलेल्या तारखेचा आधार न घेता, गुणांचा आधार घेऊन उमेदवाराला प्रतीक्षा यादीत स्थान द्यावे, असेही मॅटने स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी जालना येथील वृषाली बाळकृष्ण तांबे यांनी मॅटमध्ये अर्ज केला होता. वनपाल पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ मध्ये परीक्षा घेतली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. २९ जणांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी गेली. १० सप्टेंबर २०१३ रोजी त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. २८ जणांची दुसरी तुकडी त्यानंतर प्रशिक्षणासाठी गेली. १७ फेब्रुवारी २०१४ रोजी दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले. तांबे यांचे प्रशिक्षण दुसऱ्या तुकडीत सुरू झाले.
२०१९ मध्ये त्यांच्या सेवाज्येष्ठतेची यादी तयार करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत मिळविलेले गुण व त्याला प्रशिक्षणात मिळालेले गुण यासोबतच त्याचे प्रशिक्षण कोणत्या तारखेला सुरू झाले, याआधारे उमेदवाराला सेवाज्येष्ठतेच्या यादीत स्थान देण्यात आले. याला तांबे यांनी विरोध केला.
नियमानुसार उमेदवाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत मिळविलेले गुण व त्याला प्रशिक्षणादरम्यान मिळालेले गुण हे ग्राह्य धरूनच प्रतीक्षा यादी तयार करायला हवी. या नियमाप्रमाणे माझे नाव प्रतीक्षा यादीत वरच्या स्थानात असायला हवे. त्यामुळे त्यानुसारच प्रतीक्षा यादीत मला स्थान द्यावे, अशी मागणी तांबे यांनी केली.
‘नाव प्रतीक्षा यादीत असायलाच हवे’
सेवाज्येष्ठता ही नियमानुसारच व्हायला हवी. त्यासाठी तयार होत असलेली प्रतीक्षा यादीही नियमाला अनुसरूनच असावी. नियमानुसार उमेदवाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत मिळविलेले गुण व त्याला प्रशिक्षणादरम्यान मिळालेले गुण हे ग्राह्य धरूनच प्रतीक्षा यादी तयार व्हायला हवी. राज्य घटनेच्या आधारेच हा नियम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तांबे यांचे नाव प्रतीक्षा यादीत या नियमानुसारच असायला हवे, असे आदेश मॅटने दिले.