गड-किल्ल्यांवर वनसंपत्ती उभारणार

By admin | Published: July 9, 2017 02:34 AM2017-07-09T02:34:23+5:302017-07-09T02:34:23+5:30

सह्याद्री प्रतिष्ठानने पुरातत्त्व विभाग आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने, राज्यातील ८ गडकिल्ल्यांवर वृक्षारोपणाचा निर्णय घेतला आहे. ९ व १६ जुलै रोजी हा

Forests will be built on fort forts | गड-किल्ल्यांवर वनसंपत्ती उभारणार

गड-किल्ल्यांवर वनसंपत्ती उभारणार

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सह्याद्री प्रतिष्ठानने पुरातत्त्व विभाग आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने, राज्यातील ८ गडकिल्ल्यांवर वृक्षारोपणाचा निर्णय घेतला आहे. ९ व १६ जुलै रोजी हा उपक्रम राबवला जाणार आहे. भकास पडलेल्या गड-किल्ल्यांशेजारी वनसंपत्ती निर्माण केल्यास, पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सह्याद्री प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.
प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, ‘९ जुलै रोजी कोरीगड या ठिकाणी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाईल, तर १६ जुलैला कल्याण येथील ताहुली किल्ला, कर्जतमधील पेब (विकटगड) किल्ला आणि भिवगड, पाली येथील सुधागड व सरसगड, भिवंडीमधील फिरंग गड आणि चंद्रपूरमधील माणिकगड या ठिकाणी वृक्षारोपण केले जाईल. यामधील कोरीगड हा राज्य पुरातत्त्व विभागाच्या कक्षेत येतो. त्या ठिकाणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्यासोबत शेकडो दुर्गप्रेमी वृक्षारोपण करतील.
केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित न राहता, प्रतिष्ठानकडून या वृक्षांचे संवर्धनही केले जाणार आहे. एका किल्ल्याच्या परिसरात २०० झाडे लावण्याचा मानस आहे. झाडे जगविण्यास स्थानिकांची मदत घेतली जाणार आहे. त्यातून त्यांना रोजगारही निर्माण होईल. शोभेच्या झाडांना बगल देत, देशी झाडे लावण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला आहे. त्यात आंबा, करंज, कांचन, खैर, आपटा, आवळा, जांभूळ या झाडांचा समावेश आहे, असे रघुवीर यांनी सांगितले.

दुर्गप्रेमींनो, झाडे लावताना ही काळजी घ्या!
प्रतिष्ठानसोबत या मोहिमेत सामील होणाऱ्या दुर्गप्रेमींनी किल्ल्यांच्या परिसरात तट, बुरूज, दरवाजा, पाण्याच्या टाक्या आणि लेणी/गुहा अशा ठिकाणापासून सुमारे ५० ते १०० मीटर लांब झाडे लावावी. वृक्षलागवडीचे ठिकाण चुकले, तर झाडांची वाढ झाल्यावर, त्यांची मुळे ही काही काळाने तट, बुरूज, दरवाजे, टाके व इतर दगडी वास्तूला विळखा घालून वास्तूचे नुकसान करू शकतात, असेही प्रतिष्ठानने स्पष्ट केले.

येथे लावा झाडे : गिरी-दुर्गावर मुख्य डोगर सोंड, उतरता किंवा घसारा असेल, अशा ठिकाणी झाडे लावण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे. उन्हाळ्यात भ्रमंती करत असताना, या झाडांचा फार उपयोग होतो. किल्ल्याच्या दगडी वास्तूपासून दूर वृक्षलागवड करावी. झाडाची वाढ, त्याची मुळे किती लांब जाणार? याची काळजी घेऊनच, वृक्षलागवड करण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.

Web Title: Forests will be built on fort forts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.