झाले गेले विसरा, एकत्रितपणे निवडणुकीच्या कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 06:14 AM2019-02-26T06:14:43+5:302019-02-26T06:14:55+5:30

मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे : भाजपा-शिवसेना आमदारांना दिले आदेश

Forget it, join the polls together; Shivsena bjp leaders | झाले गेले विसरा, एकत्रितपणे निवडणुकीच्या कामाला लागा

झाले गेले विसरा, एकत्रितपणे निवडणुकीच्या कामाला लागा

googlenewsNext

मुंबई : साडेचार वर्षांत भाजपा शिवसेनेत काहीशी कटुता होती, पण आता ती उगाळत बसण्याचे काहीही कारण नाही. आपण एकत्र आलो आहोत. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका जिंकण्याचा निर्धार करून एकत्रितपणे फिरा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आमदारांना दिला.


भाजपा - शिवसेना आमदारांचे स्नेहभोजन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सोमवारी रात्री झाले. मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपा- शिवसेनेचे बहुतेक मंत्री, आमदार यावेळी उपस्थित होते.


भाजपा शिवसेनेची युती आजची नाही ती पंचवीस वर्षांपासूनची आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी युती होणे अत्यंत आवश्यक होते. युती झाली नसती, तर त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला झाला असता. इतकी वर्षे ज्यांच्या विरोधात आपण रान उठवले त्यांना आपल्या बेकीचा फायदा मिळवून द्यायचा नाही हा विचार करूनच आम्ही एकत्र आलो आहोत. वेगवेगळे लढलो असतो तर आपण पुन्हा पंधरा वर्षे मागे गेलो असतो, असे मुख्यमंत्री आणि उद्धव यांनी सांगितले.


युतीचा निर्णय आता झालेला आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने एकत्रितपणे बसून हा निर्णय घेतला आहे पण, निवडणुकीच्या मैदानात त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. युती झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास वाढला आहे.


अगदी काही ठिकाणी थोड्याफार कुरबुरी आहेत पण, लोकसभा निवडणूक लक्षात घेता त्या आता होता कामा नयेत. भाजपा आणि शिवसेनेचे आमदार, स्थानिक नेते या सगळ्यांनी एकत्रितपणे फिरण्यास सुरुवात करा, असे फडणवीस आणि ठाकरे यांनी सांगितले.
दोन्ही पक्षांचे आमदार -खासदार, पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी यांच्यात गेली साडेचार वर्षे एकोपा होताच. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंधही अत्यंत स्नेहाचे राहिले पण, काही मुद्द्यांवर मतभेद होते आणि त्यातून तणावाचे चित्र समोर आले. आता त्यावरदेखील आमच्यात चर्चा होऊन मतभेदाचे मुद्दे मार्गी लागले आहेत. युती झाल्यामुळे तुमचे चेहरेदेखील खुलले आहेत. आता तुम्ही जिल्ह्याजिल्ह्यात एकत्रित बैठका घेऊन युतीची ताकद दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: Forget it, join the polls together; Shivsena bjp leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.