सापाला दोनदा भूल, दोन तास आॅपरेशन अन् दहा टाके...
By Admin | Published: June 14, 2016 02:59 AM2016-06-14T02:59:39+5:302016-06-14T02:59:39+5:30
छोट्या प्लॅस्टिकच्या डबीत अडकून जखमी झालेल्या धामण जातीच्या सापावर सोमवारी नाशिकमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डबीत साप अडकण्याची प्राणिजगतातील
नाशिक : छोट्या प्लॅस्टिकच्या डबीत अडकून जखमी झालेल्या धामण जातीच्या सापावर सोमवारी नाशिकमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डबीत साप अडकण्याची प्राणिजगतातील ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. एका सर्पमित्राने सापाला पशुवैद्यकीय दवाखान्यात आणल्यानंतर त्याच्यावर दोन तास शस्त्रक्रिया करून डबी काढण्यात आली. सापाला दोनदा भूल द्यावी लागली, तसेच १० टाकेही घालावे लागले.
नाशिकजवळच्या विल्होळी येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीत धामण जातीचा बिनविषारी साप आढळून आला. तो एका छोट्या प्लॅस्टिकच्या डबीत अडकला होता. त्वचा काचली गेल्याने खोलवर जखम झाली होती. हे पाहून नाशिकरोड येथील सर्पमित्र अनंत वाळे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी २५ ते ३० फूट खोल विहिरीत दोरी व शिडीच्या साहाय्याने उतरून सापाला बाहेर काढले. वाळे यांनी सापाला तातडीने
अशोकस्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गायकवाड यांनी या सापावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेसाठी सापाला भुलीचे इंजेक्शन देण्यात
आले. शरीरात अडकलेली डबी कापून बाजूला काढण्यात आली. जखम स्वच्छ करण्यात आली व दहा टाके घालण्यात आले. मधल्या काळात सापाची थोडी हालचाल जाणवू लागताच पुन्हा
भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. या सगळ्या प्रक्रियेला दीड ते दोन तासाचा कालावधी लागला. मंगळवारी त्याचे बॅँडेज बदलले जाईल. सुमारे दीड महिने त्याची देखभाल केल्यानंतरच तो पूर्वस्थितीत येणार आहे. तोपर्यंत त्याला सर्पमित्र मनीष गोडबोले यांच्याकडे ठेवले जाणार आहे. (्प्रतिनिधी)
अशा प्रकारे डबीत साप अडकण्याची घटना अत्यंत दुर्मीळ आहे. हृदयापासून दीड इंच खाली ही डबी घट्ट रुतून बसली होती. एवढ्या दीर्घकाळ शस्त्रक्रिया होऊन दोनदा भूल द्यावी लागण्याची बाबही दुर्मीळ असून, राज्यात अशा खूप कमी घटना घडल्याचे सांगितले जाते.